Thane News | शिंदे गटाकडून जितेंद्र आव्हाडांना ठार मारण्याचा कट, 'राष्ट्रवादी'ची पोलिसात तक्रार | पुढारी

Thane News | शिंदे गटाकडून जितेंद्र आव्हाडांना ठार मारण्याचा कट, 'राष्ट्रवादी'ची पोलिसात तक्रार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा, ठाणे शहरातील सिंधी बांधवांमध्ये मॉर्फ केलेला व्हिडिओ प्रसारीत करून डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात चिथावणी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने कोपरी पोलीस ठाण्यात केली आहे. तसेच सिंधी बांधवांना चितावणी देऊन आव्हाड यांना ठार मारण्याचा कट शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रचल्याचा गंभीर आरोपही जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पोलीस तक्रारीत केला आहे. (Thane News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते , आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये २७ मे रोजी नेताजी चौक, उल्हासनगर येथे पक्षाची आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये केलेल्या भाषणाचा व्हिडिओ मॉर्फ करुन तो सोशल मीडियावर पसरवून आव्हाड यांची नाहक बदनामी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी शंकर मंदिर हॉल, कोपरी, ठाणे (पूर्व) येथे शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रकाश कोटवानी, रोहित गायकवाड, रमाकांत पाटील, दिपक घनश्यानी, हरेश तोलानी, भाजपा युवा मोर्चाचे ओमकार चव्हाण यांनी बैठक झाली आणि त्यात आव्हाड यांचा व्हिडिओ मॉर्फ करून तो सिंधी समाजाला दाखवून त्यांच्या घरावर हल्लाबोल मोर्चा काढण्याचा कट रचण्यात आला आणि त्यातून आव्हाड यांना जीवे ठार मारण्याचे षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे मूळ व्हि़डीओमध्ये छेडछाड करुन मॉर्फ करुन तसेच सिंधी समाजाची दिशाभूल करुन त्यांची बदनामी करण्याऱ्यांविरोधात आणि कोपरीत बैठकीमध्ये चिथावणीखोर भाषण करणाऱ्यांच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रसंगी प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांनी सांगितले की, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. पण, सत्तेचा वापर करून आव्हाड यांना बदनाम करण्याचा आणि त्यांच्या घरावर हल्लाबोल मोर्चा नेण्यासाठी चिथावणी दिली जात आहे. म्हणून आम्ही न्याय मागण्यासाठी येथे आलो आहोत. ज्यांनी व्हिडिओ मॉर्फ केला आहे. त्यांना मी समाजकंटक असेच म्हणेन. आता पोलिसांनी सत्याची कास धरून ज्या शिंदे गटाच्या लोकांनी शंकर मंदिरात बैठक घेतली. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. (Thane News)
यावेळी परिवहन सदस्य नितीन पाटील, सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, लीगल सेलचे अध्यक्ष एड विनोद उतेकर, विधानसभाध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, युवकचे विधानसभाध्यक्ष संतोष मोरे, कुणाल भोईर, दिनेश मेहरोल, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे आदी उपस्थित होते.

 हे ही वाचा :

Back to top button