चीनने अंतराळात सोडली रहस्यमय वस्तू? | पुढारी

चीनने अंतराळात सोडली रहस्यमय वस्तू?

वॉशिंग्टन : चीनचे रहस्यमय अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत 276 दिवस (नऊ महिने) राहून 9 मे रोजी पृथ्वीवर परतले. आता अमेरिकेने दावा केला आहे की या गोपनीय अंतराळयानाने पृथ्वीच्या कक्षेत एक अज्ञात वस्तू सोडली आहे. अमेरिकन इंटेलिजन्स रिपोर्टमध्ये म्हटले आहे की हे यान अमेरिकेच्या गोपनीय ‘बोईंग एक्स-37 बी’ या अंतराळयानासारखे आहे.

वॉशिंग्टन स्थित सेंटर फॉर स्ट्रॅटिजिक अँड इंटरनॅशनल स्टडिजच्या रिपोर्टनुसार चीनने जी अज्ञात वस्तू सोडली आहे ती एखाद्या रोबोटिक आर्मसारखी आहे. ही वस्तू ऑक्टोबर 2022 मध्ये सोडण्यात आली होती. ती जानेवारी 2023 मध्ये सॅटेलाईट ट्रेकिंग रडारवरून गायब झाली होती. मात्र, मार्च 2023 मध्ये पुन्हा रडावर दिसून आली. हे कसे घडले याची सध्या माहिती उपलब्ध नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या अंतराळयानात सॅटेलाईट हटवण्याचीही क्षमता आहे.

तसेच त्याचा उद्देश खराब झालेले सॅटेलाईट दुरुस्त करणे किंवा निकामी सॅटेलाईट पृथ्वीच्या कक्षेतून हटवणे हा आहे. सेंटर फॉर नेव्हल अ‍ॅनालिसिसमधील रिसर्च सायंटिस्ट केव्हीन पोलपीटर यांनी सांगितले की अमेरिकेच्या ‘एक्स-37 बी’ ने 2010 मध्ये पहिले उड्डाण केले होते. त्यावेळेपासूनच चिनी सरकार त्याच्या सैन्य क्षमतेबाबत चिंतित होते. त्यानंतर चीनने आपल्या स्प्रेस प्रोग्रॅमची सुरुवात केली. त्यामध्ये चिनी सैन्याचाही सहभाग आहे. त्यामुळे असे दिसून येते की चीनच्या गुप्त अंतराळयानात सैन्य क्षमताही असू शकतात.

Back to top button