खोर : दत्तयाग सोहळ्याची इंडिया लिम्का बुकमध्ये नोंद | पुढारी

खोर : दत्तयाग सोहळ्याची इंडिया लिम्का बुकमध्ये नोंद

खोर; पुढारी वृत्तसेवा : देऊळगावगाडा (ता. दौंड) येथील श्री क्षेत्र नारायण महाराज, बेट येथे श्री सद्गुरू नारायण महाराज यांच्या 138 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भव्य असा 1 हजार 111 यज्ञ कुंडी दत्तयाग सोहळा पार पडला. सोहळ्याची इंडिया लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. सोहळ्याची बुकने प्रथमच दखल घेतली आहे.

श्री सद्गुरू नारायण महाराजांनी 1993 साली नारायण बेटात 1 हजार 108 सत्यनारायण महापूजा घातल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी (दि. 26) याच ठिकाणी तब्बल 90 वर्षांनंतर 1 हजार 111 यज्ञ कुंडी दत्तयाग सोहळा झाला. या भव्य-दिव्य सोहळ्याची इंडिया लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य संपादक डॉ. बिश्वरूप रॉय चौधरी यांच्या वतीने श्री सद्गुरू नारायण महाराज दत्त संस्थान बेट यांना सन्मानपत्र बहाल केल्याचे संस्थानचे प्रमुख विश्वस्त संजय शितोळे व शंकरशेठ मठाचे मठाधिपती अशोक जाधव यांनी सांगितले.

भेट दिलेली सोन्याची मूर्ती तब्बल 12 वर्षांनंतर बाहेर

श्री सद्गुरू नारायण महाराज यांना 1928 मध्ये कोलकत्ता येथील दासानी नावाच्या भक्ताने दत्तात्रेयांची सोन्याची भरीव मूर्ती पूजेसाठी भेट दिली होती. सध्या ही मूर्ती पुणे येथे महाराष्ट्र बँकेच्या लॉकरमध्ये असते. या सोहळ्यानिमित्त ही मूर्ती पोलिस बंदोबस्तात या ठिकाणी तब्बल 12 वर्षांनंतर दर्शनासाठी आणली होती. कार्यक्रमानंतर दि. 26 रोजी पुन्हा ती पोलिस बंदोबस्तात लॉकरमध्ये पाठवण्यात आली.

Back to top button