पुणे : चांदणी चौकाच्या विस्तारीकरणाचे उद्घाटन जुलैमध्ये; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून आढावा | पुढारी

पुणे : चांदणी चौकाच्या विस्तारीकरणाचे उद्घाटन जुलैमध्ये; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून आढावा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चांदणी चौकाच्या विस्तारीकरणाचे उद्घाटन जुलैमध्ये होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शिल्लक राहिलेली कामे लवकर पूर्ण करून 15 जुलैला या कामांचे उद्घाटन करण्याच्या सूचना केल्या आहेत. पुणे-बंगळुरू रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये चांदणी चौकाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. गडकरी यांनी गुरुवारी (दि. 25) पुण्यामध्ये याबाबतचा आढावा घेतला.

या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते. याबाबत कदम म्हणाले, या पुलाचे दोन्ही बाजूंकडील गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. 1 जून रोजी मध्यभागातील गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे. आता सेवा रस्त्यांचेही काम पूर्ण झाल्याने मध्यभागी टाकण्यात येणार्‍या गर्डरसाठी वाहतूक थांबविण्याची गरज भासणार नाही.

ही वाहतूक सेवा रस्त्यांवरून सुरू राहील. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. गुरुवारी या चौकातील सेवा रस्त्यावरून वाहतूक सुरू केली गेली. काम 93 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित 7 टक्क्यांमध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तसेच अन्य कामांमध्ये रंगरंगोटीची कामे शिल्लक आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून त्याचे उद्घाटन 15 जुलैला करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत.

एक मेचा मुहूर्त हुकला…

ऑगस्ट 2017 मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. हा पूल ऑगस्ट 2021 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. रस्त्यांचे रुंदीकरण तसेच एक उड्डाणपूल पाडून नवा बहुमजली उड्डाणपूल बांधण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 1 मे रोजी या पुलाचे उद्घाटन करण्यात येईल, अशी घोषणा गडकरी यांनी पुण्यात असताना केली होती. मात्र, हा मुहूर्त हुकला, आता 15 जुलैचा नवा मुहूर्त ठरला आहे.

Back to top button