पुण्यापर्यंत मेट्रोचा मुहूर्त हुकला; मेट्रो प्रवासी मार्ग विस्तार पुन्हा लांबणीवर | पुढारी

पुण्यापर्यंत मेट्रोचा मुहूर्त हुकला; मेट्रो प्रवासी मार्ग विस्तार पुन्हा लांबणीवर

मिलिंद कांबळे

पिंपरी(पुणे) : पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो धावायला सुरू होऊन सव्वावर्षे झाले तरी, फुगेवाडीच्या पुढे तसेच, पुण्यापर्यंत मेट्रोची धाव अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या प्रतिसादाअभावी मेट्रो दिवसभर रिकामीच फेर्‍या मारताना दिसत आहे. पिंपरी ते पुण्यातील सिव्हिल कोर्टपर्यंत (सत्र न्यायालय) मे महिन्याच्या अखेरीस मेट्रो सुरू करण्याचा मुहूर्त हुकला आहे. पावसाळ्यात पिंपरीपासून सिव्हिल कोर्ट, वनाज व रुबी हॉल या तीन मार्गावर मेट्रो सुरू होईल, असे महामेट्रोकडून सांगण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते फुगेवाडी अशी 5.8 किलोमीटर अंतर मेट्रो धावत आहे.

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत 6 मार्च 2022 ला मेट्रो सुरू करण्यात आली. अर्धवट मार्गावर मेट्रो सुरू झाली. त्यानंतर फुगेवाडीच्या पुढे तसेच, पुणे शहरापर्यंत मेट्रो धावत नसल्याने नागरिकांचा प्रतिसाद नाही. प्रवाशांविनाच मेट्रो दिवसभर रिकामीच धावताना दिसत आहे. सव्वावर्ष झाले तरी, अद्याप मेट्रो एक स्टेशनही पुढे सरकलेली नसल्याने आणि पुणे शहरासोबत जोडली न गेल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मेट्रोच्या एका फेरीत 900 ऐवजी केवळ 31 प्रवासी

मेट्रो नागरिकांसाठी 6 मार्चपासून सुरू करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते फुगेवाडी या मार्गावर दररोज 42 फेर्या होतात. प्रत्येक 30 मिनिटांने मेट्रो ये-जा करते. 6 मार्च ते 23 मे या 443 कालावधीत एकूण 5 लाख 75 हजार 390 नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यातून महामेट्रोस 79 लाख 52 हजार 960 रुपयांचे उत्पन्न मिळाले.

सर्वांधिक 3 लाख 6 हजार 295 प्रवाशांनी पिंपरी स्टेशनवरून प्रवास केला. सर्वांधिक 43 लाख 76 हजार 135 रुपयांचे उत्पन्न पिंपरी स्टेशनवर मिळाले आहे. फुगेवाडी स्टेशनवरून 1 लाख 38 हजार 893, संत तुकारामनगर स्टेशनवरून 87 हजार 147, नाशिक फाटा स्टेशनवरून 25 हजार 592 आणि कासारवाडी स्टेशनवरून 17 हजार 493 नागरिकांनी प्रवास केला. या आकडेवारीवरून एका फेरीत केवळ सरासरी 31 प्रवासी मेट्रोतून प्रवास करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रत्यक्षात मेट्रोत एका वेळी 900 नागरिक प्रवास करू शकतात.

मेट्रोची निव्वळ नौटंकी

सव्वावर्ष झाले तरी, पिंपरी ते फुगेवाडी याच मार्गावर मेट्रो धावत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक कामे अपूर्ण अवस्थेत असताना अर्धवट मार्गावर मेट्रो सुरू केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मेट्रो एक एक स्टेशन घेत पुण्याच्या सिव्हिल कोर्ट स्टेशनपर्यंत आणि रॅबी हॉल आणि वनाज स्टेशनपर्यंत मेट्रो सुरू करण्यात येईल, असे महामेट्रोने जाहीर केले होते. मात्र, तब्बल सव्वा वर्ष लोटले तरी, मेट्रो पुढे सरकलेली नाही. रिकामीच मेट्रो इकडून तिकडे फिरत आहे. त्यावरून मेट्रोची केवळ नौटंकी सुरू असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

उत्पन्नापेक्षा खर्च अधिक

पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या संपूर्ण मार्गावर मेट्रो सुरू झालेली नाही. अर्धवट मार्गावर मेट्रो सुरू असल्याने नागरिकांना त्याचा फारसा फायदा होत नसल्याने नागरिकांनी स्वत:चे वाहन किंवा पीएमपीएलने प्रवास करणे पसंत करीत आहेत. महामेट्रोकडून मेट्रोमार्ग व स्टेशनचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यावर कोट्यवधीचा खर्च झाला आहे.

स्टेशनवरील कर्मचारी, स्टेशन मॅनेजर, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी, मेट्रोचे चालक, विजेचा वापर, सुशोभीकरण, रंगरंगोटी, मेट्रोचे अधिकारी व कर्मचार्‍यांचे वेतन असा दरमहा लाखोंचा खर्च मेट्रो संचालनावर होत आहे. मात्र, प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने उत्पन्न तुटपुंजे आहे. मेट्रो सद्यस्थितीत तोट्यात असल्याचे स्पष्ट होत आहे.

Back to top button