पुणे : थिएटरचा वापर चित्रपटांच्या स्क्रिनिंगसाठी का? विद्यार्थी संघटनेचा सवाल | पुढारी

पुणे : थिएटरचा वापर चित्रपटांच्या स्क्रिनिंगसाठी का? विद्यार्थी संघटनेचा सवाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा खास खेळ आयोजित करण्यावरून वाद झाला. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या थिएटरचा वापर अशा चित्रपटांच्या स्क्रिनिंगसाठी करू देण्यास एफटीआयआय प्रशासनाने कसा होकार दिला, असा सवाल स्टुडंट्स असोसिएशनने उपस्थित केला आहे. तर चित्रपटाचे निर्माते विपुल शाह आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी विद्यार्थ्यांचा विरोध आम्ही समजू शकतो, आम्ही विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवायला तयार आहोत, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मिती फिल्म सोसायटीतर्फे एफटीआयआयमध्ये निमंत्रितांसाठी चित्रपटाचा विशेष खेळ शनिवारी आयोजित केला होता. चित्रपटाच्या स्क्रिनिंगमुळे एफटीआयआयच्या आवारात दिवसभर गोंधळ सुरू होता. कार्यक्रमासाठी सर्व आवश्यक परवानगी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा विरोध अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कल्पनेच्या विरुद्ध होता. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांचा विद्यार्थ्यांशी शांततापूर्ण संवाद झाला, असे सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लेले यांनी सांगितले.

निर्माता विपुल शाह आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी, आयोजक संस्थेने एफटीआयआयमध्येच चित्रपटाचा खेळ का आयोजित केला, याची कल्पना नाही. आमचा चित्रपट एफटीआयआयमध्ये दाखविला जाणे अभिमानाची बाब आहे. चित्रपटाला विद्यार्थ्यांचा विरोध आम्ही समजू शकतो; पण चित्रपट पाहायचा असल्यास कोणाला आडकाठीही करू नये. चित्रपटाने कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण केलेला नाही. हा चित्रपट कोणत्याही समाज आणि धर्माच्या विरोधात नाही, असे त्यांनी सांगितले.

आमच्यातील बर्‍याच विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहिला आहे. त्यांनी आमच्याशी त्यांचा अनुभव शेअर केला आहे. सत्याचा अपलाप आणि अपप्रचार करून समाजात दुफळी निर्माण करणार्‍या चित्रपटाचे सरकारपुरस्कृत खेळ सुरू आहेत. शिक्षण संस्थेत धार्मिक घोषणाबाजी करण्याचा प्रकार राजकीय कारणाने प्रेरित आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या थिएटरचा वापर अशा कारणासाठी करू देण्यास प्रशासनाने कसा होकार दिला. आम्ही शांततेने निदर्शने केली, कोणाला थांबविले नाही. समोरून आधी घोषणाबाजी सुरू झाली, ते आम्हाला मान्य नव्हते, असे एफटीआयआय स्टुडंटस असोसिएशन तर्फे सांगण्यात आले.

एफटीआयआय विद्यार्थ्यांचे सहाव्या दिवशीही उपोषण

फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) 2020 च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी पुकारलेले उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच होते. उपोषणाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि.19) उपोषणकर्त्या तिघांपैकी एका विद्यार्थ्याची तब्येत ढासळली होती. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला शनिवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या उपोषणावर एफटीआयआय प्रशासन ढिम्म आहे.

विद्यार्थी उपोषणास बसून सहा दिवस उलटले, तरी अद्याप प्रशासनातील एकही व्यक्ती उपोषणस्थळी फिरकली नसल्याचे एफटीआयआय स्टुडंटस असोसिएशनचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षातील अनुपस्थिती आणि अपेक्षित क्रेडिट नसणे या कारणास्तव संस्थेने पाच विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ त्या वर्षातील विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गेल्या सहा दिवसांपासून काही विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत.

Back to top button