नगर: दीड लाखांचे मोबाईल तक्रारदारांना परत, कोतवाली पोलिसांची कामगिरी; विशेष मोहिमेतून चोरीचे मोबाईल हस्तगत | पुढारी

नगर: दीड लाखांचे मोबाईल तक्रारदारांना परत, कोतवाली पोलिसांची कामगिरी; विशेष मोहिमेतून चोरीचे मोबाईल हस्तगत

नगर, पुढारी वृत्तसेवा: हरवलेले तसेच चोरीला गेलेले आणि सापडलेले व जप्त केेलेले महागडे मोबाईल कोतवाली पोलिसांनी मूळ तक्रारदारांना परत केले आहेत. पोलिसांनी विशेष मोहीम राबवून तांत्रिक कौशल्यावर तपास करत चोरी गेलेले मोबाईल हस्तगत केले. एक लाख 44 हजार 900 रुपये किमतीचे मोबाईल तक्रारदारांना पोलिस ठाण्यात बोलावून पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी परत केले.

मोबाईल फोनसारख्या लहान गोष्टींचा शोध घेण्यास वेळ लागतो. मात्र, कोतवाली पोलिसांनी मोबाईल फोनचा शोध घेऊन तक्रारदार आणि मूळ मालकांना ते परत केले आहेत. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सलीम शेख, राजेंद्र फसले व प्रशांत राठोड यांनी ही कामगिरी पार पाडली.

मोबाईल यांना मिळाले परत

रंगनाथ दिवटे (रा.आगरकर मळा), विठ्ठल जोशी (रा.आनंदी बाजार), प्रवीण भालेकर (रा.केडगाव), जयश्री पुरोहित (रा.नवीपेठ), सलमान खान (रा.बेपारी मोहल्ला), गौरव आखाडे (रा.माळीवाडा), जालिंदर पुलावळे (रा.केडगाव), सारिका अडागळे (रा.कोठी), सोनाली साठे (रा.माळीवाडा), अशोक घेवरे (रा.स्टेशन रोड), सुनील कांबळे (रा.बुरुडगाव), प्रफुल्ल जाधव (रा.भिंगार).

तक्रारदारांनी मानले आभार

मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, की तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. मात्र, कोतवाली पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत केले आहेत. हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहर्‍यावर पाहायला मिळत होता. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.

Back to top button