जे. पी. नड्डा आजपासून महाराष्ट्र दौर्‍यावर | पुढारी

जे. पी. नड्डा आजपासून महाराष्ट्र दौर्‍यावर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शेजारील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव ही प्रदेश भाजपसाठीही धोक्याची घंटा असून, येणार्‍या लोकसभा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून भाजप आतापासून कामाला लागला आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे बुधवारपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यावर येत असून, ते पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या होणार्‍या बैठकीचा समारोप करणार आहेत.

प्रदेश कार्यकारिणीची बैठक 18 तारखेला पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात होत आहे. तेथे पुढील निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे. त्याचवेळी जे. पी. नड्डा हे 17 व 18 मे रोजी दौर्‍यावर येत आहेत. 18 मे रोजी ते या कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप करणार आहेत. शिवाय, मुंबईत लाभार्थ्यांशी संवाद, विचारवंतांशी संवाद, असे त्यांचे कार्यक्रम होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

बावनकुळे म्हणाले, पुण्यातील कार्यकारिणी बैठकीसाठी सुमारे दीड हजार सदस्य उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर नड्डा खासदार, आमदारांच्या बैठकीत मार्गदर्शन करतील. त्यानंतर ते राज्यातील केंद्रीय मंत्री व राज्यातले मंत्री यांच्याशीही संवाद साधणार आहेत.
नड्डा यांचे बुधवारी 17 मे रोजी सकाळी 11 वाजता आगमन होणार आहे. देवनार येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांच्या मुंबईतील कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर आरबीके हॉल येथे लाभार्थी संवाद, बोरिवली येथील अटल स्मृती उद्यानात विचारवंतांशी संवाद, चारकोप येथे पन्नाप्रमुख बैठकीत सहभाग, मुंबईतील पक्षाच्या मोर्चा, आघाडीप्रमुखांशी संवाद, असे विविध कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत होणार आहेत. नड्डा हे रमाबाई आंबेडकरनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनही करणार आहेत. 18 मे रोजी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद, साधणार आहेत.

Back to top button