LSG vs MI : लखनौचे मुंबईला १७८ धावांचे आव्हान | पुढारी

LSG vs MI : लखनौचे मुंबईला १७८ धावांचे आव्हान

लखनौ; वृत्तसंस्था : मार्कस स्टॉयनिसने केलेल्या झंझावाती 89 धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंटस्ने मुंबई इंडियन्सविरुद्ध 3 बाद 177 धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी लखनौच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना झटपट माघारी पाठवले होते. परंतु स्टॉयनिस व पंड्या जोडी खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभी राहिली आणि 82 धावांची भागीदारी करून मॅच फिरवली. 49 धावांवर असताना पंड्या रिटायर्ड हर्ट झाला अन् निकोलस पूरनला अखेरच्या चार षटकांत मोठी धावसंख्या उभी करण्याची संधी दिली. स्टॉयनिस व पूरन यांनी पंड्याचा हा डाव यशस्वी ठरवताना शेवटच्या 3 षटकांत 54 धावा ठोकून मुंबई इंडियन्ससमोर तगडे लक्ष्य ठेवले.

लखनौच्या अटलविहारी वाजपेयी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंटस्विरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दीपक हुडा व क्विंटन डी कॉक ही जोडी सलामीला आली. हुडाचा फॉर्म हा लखनौसाठी डोकेदुखी ठरला आहे. तिसर्‍या षटकात जेसन बेहरनडॉर्फने सलग दोन चेंडूंवर हुडा (5) आणि प्रेरक मंकड (0) यांना बाद केले. क्विंटन व कृणाल पांड्या यांनी लखनौच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण, पीयूष चावलाने 7 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर क्विंटनला (16) बाद केले. अप्रतिम वळणारा चेंडू क्विंटनच्या बॅटची कड घेत यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. बाद होण्यापूर्वी क्विंटनने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 9 हजार धावांचा टप्पा ओलांडला.

मार्कस स्टॉयनिस व कर्णधार कृणाल या जोडीने चौथ्या विकेटसाठी 35 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करून लखनौची गाडी रुळावर आणली. स्टॉयनिसने चांगले उत्तुंग फटके खेचून मुंबईच्या गोलंदाजांवर दडपण निर्माण केले. स्टॉयनिससोबत 59 चेंडूंत 82 धावांची भागीदारी केल्यानंतर कृणाल रिटायर्ट हर्ट झाला. त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. पांड्याने 42 चेंडूंत 49 धावा केल्या.

स्टॉयनिसने षटकार खेचून 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या 18व्या षटकात स्टॉयनिसने 6, 0, 4, 4, 6, 4 अशा 24 धावा चोपल्या. हे या मॅचमधील महागडे षटक ठरले. जॉर्डनच्या 4 षटकांत 50 धावा आल्या. बेहरेनडॉर्फने मात्र टिच्चून मारा करताना 4-0-30-2 असा स्पेल टाकला. त्याच्याही अखेरच्या षटकात 15 धावा स्टॉयनिसने चोपल्या. लखनौने 20 षटकांत 3 बाद 177 धावा केल्या. स्टॉयनिस 47 चेंडूंत 4 चौकार व 8 षटकारांसह 89 धावांवर नाबाद राहिला आणि पूरनसोबत (8) त्याने 60 धावा जोडल्या.

हेही वाचा;

Back to top button