अहमदनगर : पुणतांबा, गोवर्धन वाळू डेपोकडे ठेकेदारांची पाठ; फेर ई-निविदा मागविल्या | पुढारी

अहमदनगर : पुणतांबा, गोवर्धन वाळू डेपोकडे ठेकेदारांची पाठ; फेर ई-निविदा मागविल्या

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : चापडगाव, चौंडीपाठोपाठ पुणतांबा व गोवर्धन येथील वाळू डेपोसाठी ठेकेदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने या दोन्ही वाळू डेपोसाठी जिल्हा प्रशासनाने फेर ई -निविदा प्रसिद्ध केली आहे. आजमितीस फक्त नायगाव वाळू डेपोसाठी ठेकेदाराचा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, अद्यापि या वाळू डेपोवरून वाळू विक्री सुरू झालेली नाही. नवीन वाळू धोरणानुसार सर्वसामान्य जनतेला बांधकामासाठी अवघे सहाशे रुपये ब्रास वाळू उपलब्ध होणार आहे.

त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रारंभी श्रीरामपूर येथील नायगाव, शेवगाव तालुक्यातील चापडगाव व जामखेड तालुक्यातील चौंडी या तीन ठिकाणी वाळू विक्रीसाठी वाळू डेपो प्रस्तावित केले. या वाळू डेपोसाठी वाळू उत्खनन, वाहतूक आणि विक्री व्यवस्थापन यासाठी जिल्हा प्रशासनाने ई-निविदा प्रसिद्ध केली होती. यापैकी फक्त नायगाव वाळू डेपोसाठी निविदा मंजूर झाली आहे.

जिल्हा प्रशासनाने प्रारंभी चापडगाव, नायगाव व चौंडी या तीन ठिकाणी वाळू डेपो निश्चित केले. त्यानंतर राहाता तालुक्यातील पुणतांबा, संगमनेर तालुक्यातील आश्वी बु., श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज, श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन, नेवासा तालुक्यातील निंभारी व कर्जत तालुक्यातील नालेगाव या सहा ठिकाणी वाळू डेपो प्रस्तावित केले आहेत. या सर्व नऊ डेपोवरून 1 लाख 94 हजार ब्रास वाळू विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. नायगाव डेपोला ठेकेदार मिळाला असून, यामधून 67 हजार 539 ब्रास वाळू विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील वाळू डेपोतून 54 हजार 717 ब्रास व गोवर्धन डेपोतून 8 हजार 321 ब्रास वाळू विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 मे रोजी ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या होत्या. प्रत्येक वाळू डेपोसाठी 3 निविदा येणे आवश्यक आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी निविदांची संख्या कमी होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 11 मे रोजी फेर ई-निविदा प्रसिद्ध केली. 15 मे रोजी ऑनलाईन निविदा उघडल्या जाणार आहेत.

Back to top button