कोल्हापुरी चटणी लय भारी! | पुढारी

कोल्हापुरी चटणी लय भारी!

कोल्हापूर, कृष्णात चौगले : पावसाळ्याच्या अगोदर वषर्र्भराची चटणीची बेजमी करण्याकडे महिलांचा कल असतो. यावर्षी मिरचीच्या सर्व प्रकारात दर्जानुसार 10 ते 15 टक्के दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना त्याची झळ बसत आहे.

तांबड्या रश्श्यासाठी प्रसिद्ध असणार्‍या कोल्हापुरात कोल्हापुरी चटणीचा मिरची व मसाले मिळून एक किलोला साडेपाचशे ते सहाशेवर खर्च येत असल्याने महिलांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आपल्याकडे प्रामुख्याने कर्नाटक व जवळपासच्या राज्यातून लाल मिरची विक्रीसाठी येते. यातही संकेश्वरी व ब्याडगी मिरची घेण्याकडे महिलांचा कल असतो. गतवर्षीपेक्षा यावर्षी मिरचीच्या प्रतवारीनुसार 10 ते 15 टक्के भाववाढ झाली आहे. 250 पासून सहाशे ते नऊशेपर्यंत लाल मिरचीचे बाजारातील दर असून याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

तुलनेने मिरचीची आवक कमी झाल्याने दर वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यासोबत मसाला व ते तयार करण्याचा दरही वधारल्याने त्याचाही फटका बसत आहे. काही ग्राहक यातून पर्याय म्हणून तयार केलेली चटणी खरेदी करतात. मात्र, त्याच्यातही प्रतिकिलो 50 ते 80 रुपयांनी दर वाढले आहेत. शहरातील बहुतांश ग्राहक तयार चटणी घेत असतात. ग्रामीण भागात मात्र मिरची घेऊन त्याची चटणी तयार करण्याकडे कल असतो. सध्याच्या मिरची, मसाले व चटणी तयार करण्याचा दर विचारात घेता प्रतिकिलो पाचशे ते सहाशे रुपये खर्च येत आहे.

Back to top button