कोल्हापूर : गोकुळ अध्यक्ष बदलावर नेते ठाम | पुढारी

कोल्हापूर : गोकुळ अध्यक्ष बदलावर नेते ठाम

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गोकुळचा अध्यक्ष बदलण्यावर आघाडीचे नेते ठाम आहेत. लवकरच यासंदर्भात नेत्यांची बैठक होणार असल्याचे समजते. दरम्यान, अध्यक्षपदासाठी अरुण डोंगळे यांचे नाव आघाडीवरआहे.

गोकुळमध्ये सत्ता बदलात विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांचा मोठा वाटा आहे. गोकुळची सत्ता ज्यांच्या ताब्यात होती ते माजी आमदार महादेवराव महाडिक हे विश्वास पाटील आपल्याकडे ठराव घेऊन येणार म्हणून वाट पहात असताना पाटील ठराव घेऊन आ. सतेज पाटील यांच्याकडे गेले. त्याचबरोबर अरुण डोंगळे यांनीही आ. पाटील यांच्यासोबत जाणे पसंत केले. पाटील व डोंगळे यांच्या निर्णयामुळे गोकुळचे राजकारण बदलण्यास नेत्यांना मदत झाली.

सत्तांतरानंतर अध्यक्ष निवडीवेळी विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आले. मात्र ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर विश्वास पाटील यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय सतेज पाटील व आ. हसन मुश्रीफ यांनी घेतला. हा निर्णय घेत असताना त्यांनी डोंगळे यांना दोन वर्षांनी संधी देण्याचा शब्द दिला. विश्वास पाटील यांना दि. 14 मे रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांना मुदतवाढ की नव्या अध्यक्षांची निवड याकडे लक्ष लागले असतानाच अध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली आहे. यातूनच गोकुळच्या सत्तांतरात आघाडीवर राहिलेले अरुण डोंगळे हे अध्यक्षपदाचे दावेदार आहेत. त्यामुळे विश्वास पाटील नंतर अध्यक्षपदासाठी डोंगळे यांचेच नाव कायम आघाडीवर राहिले आहे.

सतेज पाटील, मुश्रीफ घेणार निर्णय

आघाडीचे नेते आ. सतेज पाटील कर्नाटकच्या निवडणुकीत व्यस्त होते, तर राष्ट्रवादीत खा. शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून पक्षात सुरू झालेल्या घडामोडीमुळे मुश्रीफ मुंबईतच होते. कर्नाटकच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे सतेज पाटील आणि मुश्रीफ दोन दिवसांत कोल्हापुरात येतील. त्यानंतर ते यासंदर्भात बैठक बोलावून निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Back to top button