कर्नाटकात 67 टक्के मतदान | पुढारी

कर्नाटकात 67 टक्के मतदान

बंगळूर, पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि पुढच्या वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणार्‍या कर्नाटक विधानसभेसाठी बुधवारी किरकोळ हिंसाचार वगळता 67.20 टक्के मतदान झाले.

मतदान संपताच खासगी संस्था तसेच वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस बहुमताच्या आसपास पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला; तर भाजप नव्वदीपर्यंत राहील, अशी शक्यता आहे. विधानसभेच्या एकूण 224 जागा असून, बहुमतासाठी 113 हा जादुई आकडा आहे. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 110 पर्यंत जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपला 90, तर निधर्मी जनता दलाला 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे.

राज्यात सर्वाधिक 79.39 टक्के मतदान रामनगर जिल्ह्यात, तर सर्वात कमी 49.65 टक्के मतदान बंगळूर दक्षिण मतदारसंघात झाले. बेळगाव जिल्ह्यात 78 टक्के मतदान झाले.

ईव्हीएम बंद पडल्याने काही ठिकाणी गोंधळ

राज्यात दिवसभरात काही ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्यात बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यात व निपाणी तालुक्यातील गळतगा व गजबरवाडी गावांत मशिन बंद पडले होते. त्यामुळे मतदान लांबले. तेथे सायंकाळी 6 या निर्धारित वेळेनंतरही मतदान घेण्यात आले.

ईव्हीएम घेऊन जाणार्‍या कारवर हल्ला

राज्यात सहा ठिकाणी किरकोळ हिंसाचार वगळता मतदान शांततेत पार पडले. विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी तालुक्यातील अतिरिक्त ईव्हीएम घेऊन जाणार्‍या कारवर हल्ला झाला. हल्ल्यात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनची तोडफोड करण्यात आली. निवडणूक अधिकार्‍यांच्या वाहनांचेही नुकसान केले. अधिकारी यंत्रे बदलून मतदानात छेडछाड करत असल्याची अफवा पसरल्याने हा हल्ला घडला.

पद्मनाभ विधानसभा मतदारसंघाच्या पपया गार्डन मतदान केंद्रावर लाठ्या घेऊन काही तरुणांनी विरोधकांवर हल्ला केला. या हल्ल्यात मतदान करण्यासाठी आलेल्या काही महिला जखमी झाल्या. तिसरी घटना बळ्ळारी जिल्ह्यात घडली. संजीव नारायण कोटे येथे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

Back to top button