‘स्मार्ट एलईडी’ दिव्याखाली अंधार ; महासभेत नगरसेवकांचा विद्युत विभागाला ‘शॉक’ | पुढारी

‘स्मार्ट एलईडी’ दिव्याखाली अंधार ; महासभेत नगरसेवकांचा विद्युत विभागाला ‘शॉक’

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरात स्मार्ट एलईडी दिवे बसविले; पण त्या दिव्याखाली अंधार आहे. जुना एक दिवा लावला तरी संपूर्ण कॉलनीत प्रकाश होता. आता कॉलनीत चार दिवे लावले तरी प्रकाश दिसत नाही, अशा तक्रारी मंगळवारी महासभेत करण्यात आल्या. शहरात अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. वारंवार तक्रार करूनही दिवे सुरू होत नाही, असा आरोप नगरसेविका मालन ढोणे, रूपाली वारे, मनीषा बारस्कर यांनी केला. त्यावर विद्युत विभागाचे प्रभारी अधिकारी कोके निरुत्तर झाले. ठेकेदाराची अडचण नागरिकांनी का सहन करायाची असा सवाल नगरसेवक कुमार वाकळे, राजेश कातोरे, मनोज कोतकर यांनी केला.

बिल बचतीसाठी एक भागातील दिवे बंद
महापालिकेने स्मार्ट एलईडी दिवे बसविल्याने आज 60 लाखाऐवजी 22 लाख रुपये वीजबिल येते, असे उपायुक्त यशवंत डांगे म्हणाले. त्यावर नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले, वीजबिल बचतीसाठी विद्युत विभाग अदलून बदलून पथदिवे बंद ठेवतात. त्यात जुने पथदिव्याचे पोल व पथदिवे ठेकेदाराने काढून नेले, असे नगरसेवक म्हणाले. आयुक्त म्हणाले, मनपा निधीतून नवीन खांब व दुरूस्तीची कामे केली जातील.

ओपन स्पेसवर धार्मिक स्थळांना परवानगी द्या
मनपा हद्दीमधील ओपन स्पेसमधील जुने व नवीन धार्मिक स्थळे (मंदिरे) यांना कायदेशीर परवानगी द्यावी. जेणेकरून नागरिक धार्मिक स्थळांचा विकास करतील. नागरिकांच्या भावना धार्मिक स्थळाशी जोडल्या आहेत. त्यामुळे ओपन स्पेसमध्ये धार्मिक स्थळांना परवानगी द्यावी. जुन्या धार्मिक स्थळांना नियमाकुल करावे, अशी मागणी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी महासभेत केली. त्यावर आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले, कायद्याच्या चौकटीत बसत असल्यास व सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यास ओपन स्पेसवर नवीन धार्मिक स्थळांना परवानगी दिली जाईल.

बालिकाश्रम रोडला पाणी द्या
अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड भागातील पाणी प्रश्न अनेक महिन्यांपासून विस्कळित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी मनपा महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे यांनी केली. जलअभियंता परिमल निकम म्हणाले, की बालिकाश्रम रोडचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी फेज 2 पाणी योजना कार्यन्वित करण्याचे काम सुरू आहे. येत्या 15 दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल. तसेच, केडगाव, कल्याण रोड, वारुळाचा मारुती, बागरोजा हाडको पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नगरसेवक मनोज कोतकर, श्याम नळकांडे यांनी केली.

मनपा ठेकेदाराला चालवायला द्यायची का?
मनपाने गेल्या आठ महिन्यांपूर्वी दोन पोकलेन खरेदी केले. ते चालकाअभावी उभे आहे. दुसरीकडे नालेसफाई ठेकेदामार्फत सुरू केली आहे. मनपाला चालक मिळत नाही मग पोकलेन घेतले कशाला असा सवाल उपस्थितीत करीत मनपा ठेकेदाराला चालवायला द्यायची का असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपायुक्त डांगे म्हणाले, येत्या आठ दिवसांत पोकलेनवर चालकांची नियुक्ती करण्यात येईल.

वेतन आयोगाच्या प्रस्तावात त्रुटी
मनपा कर्मचार्‍यांचा 7 वेतन आयोगाचा प्रस्ताव शासनाला पाठविल्याचे आयुक्त म्हणाले होते. त्यावर नगरसेवक श्याम नळकांडे यांनी विचारणा केली असता साबळे म्हणाले, प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र, शासनाने त्यात त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटी दूर करून तो प्रस्ताव आयुक्तांच्या सहीसाठी ठेवला आहे. सही झाल्यानंतर शासनाकडे पाठविण्यात येईल.

ओपन स्पेस हवाच
नवीन नियमानुसार एक एकराच्या आत लेआऊट असल्यास त्याला ओपन स्पेस सोडण्याची आवश्यकता नाही. तर, रस्तेही सहा मिटरचे टाकले जात आहेत. ते नागरिकांच्या गैरसोयीचे आहे. त्याला ओपन स्पेस सोडण्यात यावा व 9 मिटरचा रस्ता करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक कुमार वाकळे यांनी केली. त्यावर आयुक्त डॉ. जावळे म्हणाले, तसा प्रस्ताव 15 दिवसांत सभागृहात ठेवण्यात येईल.

भिंगारचा अहवाल शासनाकडे
भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समावेश करण्याबाबत हालचाली सुरू आहे. याबाबत शासनाने माहिती मागविली होती. त्याची नेमकी स्थिती काय आहे. यावर आयुक्त म्हणाले, शासनाच्या नगरसचिव कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे.

खोटे प्रमाणपत्र देणार्‍याची चौकशी करा
रस्ता कामाचा स्टेट रिपोर्ट व थर्ड रिपोर्टचे खोटे प्रमाणपत्राद्वारे गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारण मनपाने 778 रिपोर्ट दिले. तंत्रनिकेतन महाविद्यालयाने 449 रिपोर्ट दिले. त्यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे माहिती अधिकारात दिसून आले. त्यात तथ्या आहे का त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक महेंद्र गंधे यांनी केली. त्यावर आयुक्त म्हणाले, याबाबतचा अर्ज प्राप्त झाला आहे. अतिरिक्त आयुक्तांकडे चौकशी दिली आहे. चौकशी झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल.

Back to top button