चक्क आईच्या पोटातील बाळावर मेंदूची शस्त्रक्रिया | पुढारी

चक्क आईच्या पोटातील बाळावर मेंदूची शस्त्रक्रिया

वॉशिंग्टन : वैद्यकीय विज्ञानाने आता थक्क करणारी प्रगती केली आहे. अमेरिकन डॉक्टरांनी तर आता एक अनोखी कामगिरी करून दाखवली आहे. त्यांनी आईच्या पोटात असलेल्या बाळाच्या मेंदूवर शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. जे बाळ अजून जन्मालाही आलेले नाही त्याच्यावर अशी शस्त्रक्रिया करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे.

अमेरिकेच्या मॅसाच्युसेटस् राज्यातील बोस्टनमध्ये ही शस्त्रक्रिया झाली. या भ्रूणामध्ये घातक संवहनी (व्हॅस्क्युलर डिसीज) आजार होता. आता शस्त्रक्रिया करून त्यांनी या बाळाला जन्मापूर्वीच जीवनदान दिले आहे. जर ही शस्त्रक्रिया झाली नसती तर जन्माला आल्यानंतर काही वेळातच त्याला हार्ट फेल्युअर किंवा स्ट्रोक होण्याचा धोका होता. यापूर्वीही गर्भस्थ बाळावर मेंदूच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत; पण अशा स्थितीतील शस्त्रक्रिया यापूर्वी झाली नव्हती.

ज्या आजारावर हा उपचार करण्यात आला त्याला ‘वेन ऑफ गॅलेन’ विकृती असे म्हटले जाते. डॉक्टरांनी 34 आठवड्यांची गर्भवती असलेल्या महिलेवर अल्ट्रासाऊंडचा वापर करीत ही शस्त्रक्रिया केली. बोस्टन चिल्ड्रेन हॉस्पिटलचे डॉ. डॅरेन ओरबॅक यांनी सांगितले की हे बाळ गेल्या सहा आठवड्यांपासून ठणठणीत आहे हे सांगण्यात आम्हाला आनंद होत आहे. त्याला कोणतेही औषध दिले जात नाही व त्याचे वजनही योग्यप्रकारे वाढत आहे. मेंदूने नकारात्मक परिणाम दाखवल्याचे कोणतेही लक्षण दिसत नाही.

Back to top button