नाशिक : खराब बियाणांमुळे शेतकऱ्याची ग्राहक न्यायालयात धाव | पुढारी

नाशिक : खराब बियाणांमुळे शेतकऱ्याची ग्राहक न्यायालयात धाव

नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा

ऐन हंगामात पिकांची लागवड करताना नगरसुल येथील शेतकऱ्याची बियाणांमुळे नव्वद टक्के फसवणूक झाल्याने येथील शेतकऱ्यांनी गावपातळीवरील पंचनामा पार पडल्यानंतर नुकसानभरपाईपाेटी ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे.

येवला तालुक्यातील नगरसुल येथील कांदा उत्पादकाने उन्हाळ कांदा लागवडीसाठी नाशिक जिल्ह्यातील चितेगांव येथील कांदा अनुसंशोधन केंद्राचे NHRDF कंपनीचे बियाणे घेतले होते. त्यानुसार येवला येथील NHRDF कंपनीचे अधिकृत विक्रेते नंदा सीड्स येवला यांच्याकडून कांदा बियाणे जात रेड- 3, NHRDF लाॅट नंबर 22011216 हे दोन किलो पॅकेट याप्रमाणे कांदा बियाणे खरेदी करण्यात आले. त्यानंतर कांदा रोप तयार करून दि. 28 नोव्हेंबर 2022 ला नगरसूल मौजे येथील गट नंबर 1708 मध्ये 30 गुंठे लागवड केली. तसेच लागवडीनंतर पिकांचे संगोपन खत, पाणी व्यवस्थापन योग्यरीतीने केले. परंतु, जेव्हा कांदा गाठ बांधायला लागला. त्यावेळी संपूर्ण कांदा लागवड केलेल्या क्षेत्रात डोंगळे दिसायला लागले आहेत. कांदा जमिनीबाहेर काढून बघितला असता कांद्याला दोन तिन फनगडे आलेले दिसले. कांदा लागवडीसाठी देण्यात आलेले बियाणांमुळे फसवणुक झाल्याचे लक्षात येताच शेतकरी भाऊलाल कुडके यांनी बियाणे खरेदी केलेल्या येवला येथील नंदा सीड्स दुकानात तक्रार दाखल केली. त्यावर संबंधितांनी पाहणी करुन बियाणे खरोखरच खराब असल्याचे नंदा सीड्स मालकांना कळवले. त्यानंतर कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली. कृषी विभागाकडे दाखल तक्रारीनुसार येवला पंचायत समितीचे कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सुर्यवंशी, पिंपळगाव बसवंत कृषी संशोधन केंद्राचे डॉ. आर. बी. सोनवणे व येवला पंचायत समितीचे यु. बी. सुर्यवंशी यांनी कांदा पिकाची पहाणी केली. यामध्ये येथील पिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कांदा दुभाष्या व डेंगळे असल्याचे आढळून आले. कांदा पहाणी निकषासाठी कर्मचाऱ्यांनी एक मिटर बाय एक मिटर क्षेत्रातील कांदे जमिनीबाहेर काढले असता मोठ्या प्रमाणात कांद्याला डोंगळे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर पाहणी समितीने अभ्यास करून पंचनामा प्रत ही शेतकरी कुडके यांच्याकडे दिली आहे. त्याचप्रमाणे सटाणा येथील शेतकरी यांना देखील कांदा बियाणांचा मोठा फटका बसला असून त्यांची देखील फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे.

नगरसूल : कांदा पिकाची पाहणी करताना कृषी विभागाचे कर्मचारी.

पंचनामा केला असता…
पंचनामा प्रत आधारे शेतकरी कुडके यांनी वकिलांच्या माध्यमातून त्वरीत नाशिक येथील ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दर्शनी अधिकारी यांनी पाहणी केली असता एक मिटर बाय एक मिटर वरील कांद्याची प्रतवारी मोजली असता डोंगळे असणाऱ्या कांद्याची संख्या ३४ निघाली आहे तर चांगला कांद्याची संख्या केवळ १६ एवढीच आली आहे. यावरुन कांदा बियाणे खराब होते हे पंचनाम्यावरुन सिध्द झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कांदा नुकसान झाल्याने संपूर्ण क्षेत्राचे अवलोकन करण्यात आले. त्यावरुन निर्देशनास आले की, कांदा लागवड केलेल्या एकूण क्षेत्रात 80 ते 90 टक्के कांदा हा दुभाळा, फनगडे व डेंगळे आलेली होती. लागवडीचे क्षेत्र 30 गुंठे असल्याने त्याचे क्षेत्रफळ पहाता खरोखर 80 ते 90 टक्के  शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा:

Back to top button