कोल्हापूर : कळंबा कारागृहात सुरक्षेचा खेळखंडोबा! | पुढारी

कोल्हापूर : कळंबा कारागृहात सुरक्षेचा खेळखंडोबा!

कोल्हापूर, दिलीप भिसे : कडेकोट तटबंदी, भक्कम सुरक्षा व्यवस्थेचा दावा करणार्‍या कळंबा मध्यवर्ती कारागृहात अक्षरश: खेळखंडोबा सुरू आहे. तीन दिवसांच्या काळात 6 मोबाईल, चार्जर आणि बॅटरींच्या साठ्यासह गांजा आढळून आल्याने ढिसाळ व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

सलग तीन दिवसांत सहा मोबाईलसह अन्य संशयास्पद वस्तू आढळल्याने कळंबा कारागृहाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. कारागृह अधीक्षकांच्या नियुक्तीविना पाच वर्षांपासून कारागृहाचा कारभार सुरू आहे. एकेकाळी मुंबई, पुणे, तळोजा, नागपूरपाठोपाठ कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातील चोख सुरक्षा व्यवस्था वाखाणली जात होती.

अव्वल दर्जाची सुरक्षा आणि वरिष्ठांसह सुरक्षा रक्षकांच्या कर्तव्यनिष्ठतेमुळे मुंबई, पुण्यासह देश-विदेशातील गुन्हेगारी टोळ्यांवर यंत्रणेचा धाक होता. सुरक्षा रक्षकाच्या डोळ्याला डोळा लावण्याची कोणाची बिशाद नव्हती; पण सद्यस्थितीत कळंबा कारागृहाची स्थिती अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी ठरत आहे.

अलीकडच्या काळात कैद्यांच्या गटा-तटात होणार्‍या मारामार्‍या तसेच अधिकारी, रक्षकांवर होणार्‍या हल्ल्यांचा घटना पाहता प्रशासनाचा वचक आहे की नाही, याबाबत शंका येते. कडेकोट तटबंदी आणि प्रवेशद्वारावर रात्रंदिवस शस्त्रधारी रक्षकांचा खडा पहारा असतानाही कारागृहात मोबाईल, गांजा, चार्जर, बॅटरींसह सिमकार्ड कैद्यांपर्यंत पोहोचतात कशा, हा संशोधनाचा विषय आहे.

प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे कळंबा कारागृहाची पुरती बेअब्रूू होऊ लागली आहे. कोल्हापूर, सांगलीसह मुंबई पुण्यातील कुख्यात गुंडाच्या टोळ्या कळंबा कारागृहात बंदिस्त आहेत. अन्य कारागृहाच्या तुलनेत कळंबा कारागृह कैद्यांच्या गर्दीने खचाखच भरलेला असतानाही प्रशासनाकडून होणारा निष्काळजीपणा भविष्यात सार्‍यांनाच भोवणारा आहे.

सिनेमा स्टाईल गुंडागर्दी

पाच महिन्यांपूर्वी कळंबा कारागृहात कारावास भोगणार्‍या दोन कैद्यांच्या टोळ्यांमध्ये चकमक उडाली. दगडाने डोके ठेचून सत्यपालसिंग कोठाडा या कैद्याचा खूनही याच कारागृहात झाला. एका टोळीने सुरक्षा रक्षकावरच जीवघेणा हल्ला केला होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून या रक्षकाचा जीव वाचला. कारागृहात वाढणार्‍या घटना भविष्यात धोकादायक ठरणार्‍या आहेत.

Back to top button