भंडारा : तुमसर नगर परिषदेच्या आरोग्य निरीक्षकाला मारहाण | पुढारी

भंडारा : तुमसर नगर परिषदेच्या आरोग्य निरीक्षकाला मारहाण

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : तुमसर नगर परिषदेत आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक मोहन वासनिक हे कार्यालयीन कामे करत असताना दोन तरुणांनी कार्यालयात प्रवेश करत त्यांना अश्लिल शिवीगाळ व मारहाण करून जखमी केल्याची घटना २४ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता घडली.

यश चंद्रशेखर बघेले (२७), बाबू कैलास शेंदुर्णीकर (१९) दोघेही रा.आझाद नगर, तुमसर अशी मारहाण करणा-यांची नावे असून त्यांच्याविरोधात तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमसर नगरपरिषदेतील आरोग्य विभागात मोहन वासनिक आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. कार्यालयात आपले कर्तव्य बजावत असताना दुपारच्या सुमारास दोन तरुणांनी नगर परिषद कार्यालयात प्रवेश करून ‘माझ्या वडिलांना कामावर का घेतला नाही’ असे बोलून भांडण करत अश्लिल शिवीगाळ व शर्टचे कॉलर पकडून गालावर थापडबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोग्य निरीक्षक मोहन वासनिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी आरोपींविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करून अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Back to top button