म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलावर नागरिकांनी केले जनआक्रोश आंदोलन | पुढारी

म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलावर नागरिकांनी केले जनआक्रोश आंदोलन

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील पूल खचुन सहा ते सात महिने झाले. तरी पालिका प्रशासन या पुलाची दुरुस्ती करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांनी खचलेल्या म्हाळुंगी नदी पुलावर नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जन आक्रोश आंदोलन करून संताप व्यक्त केला. येत्या आठ दिवसात पुलाच्या दुरुस्तीच्या कामास जर सुरुवात झाली नाही, तर नगर पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी आणि माजी नगरसेवकांनी दिला.

संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील श्री स्वामी समर्थ मंदिरापासून ते साईबाबा मंदिरापर्यंत असलेला पूल खचल्यामुळे परिसरातील नागरिकांचे तसेच दि ग सराफ विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे परिसरातील संतप्त झालेल्या नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेशी पत्रव्यवहार करून या पुलाच्या दुरुस्तीसाठी पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला.

त्यानंतर पालिकेने या पुलाच्या जवळच दुसरा छोटा पूल तयार केला, परंतु तो पूल वाहतुकीसाठी उपयोगी नसून तो पावसाळ्यात वाहून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करून नवीन पूल वाहतुकीस खुला करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याकडे केली आहे.

यावेळी माजी नगरसेविका अल्पना तांबे, माजी नगरसेवक कैलास श्रीराम गणपुले, वाकचौरे शिरीष मुळे, ज्ञानेश्वर कर्पे, कैलास लोणारी, निलेश जाजू, अविनाश थोरात, संजय शिंदे, संग्राम जोंधळे, चंद्रशेखर कानडे, भाऊ जाखडी, सुषमा तावरे, संजय क्षत्रिय, अमोल खताळ, दीपक भगत, राहुल भोईर उपस्थित होते. .

या पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झालेला आहे. लवकरच निविदा काढून पूल दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल.

                                                               – मुख्याधिकारी, राहुल वाघ 

Back to top button