पिंपरी : बांधकाम साहित्य चोरणारे त्रिकूट जेरबंद | पुढारी

पिंपरी : बांधकाम साहित्य चोरणारे त्रिकूट जेरबंद

पिंपरी : बांधकामाचे साहित्य चोरून नेणार्‍या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. महाळुंगे एमआयडीसी पोलिसानी 9 एप्रिल रोजी ही कारवाई केली. अली अब्दुल रहीम साहू (26, रा. कुदळवाडी, मूळ रा. उत्तरप्रदेश), जमाल अख्तर सबिर अहमद चौधरी (38, रा. कुदळवाडी, मूळ रा. उल्हासनगर, ठाणे), मोहम्मद इसरार मेहमूद शाह (32, रा. कुदळवाडी, मूळ रा. उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायि अनिलकुमार श्रीधरन पणीकर (50, रा. देहुरोड) यांचे बांधकामाचे साहित्य 5 एप्रिल रोजी सावरदरी (ता. खेड) येथून चोरीला गेले होते. याप्रकरणी पणीकर यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपींनी बांधकाम साहित्य चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींनी चोरी केल्याचे कबुल केले. लोखंडी सेंट्रिंग प्लेटा, गोलाकार लोखंडी पाईप, लोखंडी शिकंजा व टेम्पो जप्त असा सात लाख 97 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले. वरीष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर, निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील, उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलिस कर्मचारी राजू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर, संतोष काळे, किशोर सांगळे, शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

गोमांस घेऊन जाणार्‍या एकास अटक

परांडा येथून मुंबईला गोमांस घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. किवळे गुरुवारी (दि. 20) पहाटे तीन वाजता ही कारवाई करण्यात आली. दीपक रफिक पैगंबर (28, रा. सोलापूर) असे अटक केलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. याप्रकरणी शिवशंकर राजेंद्र स्वामी (27, रा. पुणे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परांडा येथून मुंबईकडे गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी किवळे परिसरात सापळा रचून टेम्पो पकडला. टेम्पोची तपासणी केली असता पोलिसांना बारा लाख 60 हजार रुपये किमतीचे गोवंशसदृश जनावरांचे मांस मिळून आले. टेम्पोचालक दीपक याच्याकडे मांस वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी पंधरा लाखांचा टेम्पो आणि बारा लाख 60 हजारांचे गोमांस असा एकूण 27 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

देहूरोडमध्ये पन्नास हजारांची घरफोडी

दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 19) सायंकाळी सहा ते साडेसातच्या कालावधीत विकासनगर, देहूरोड येथे घडली. महादेव हरिभाऊ कडलग (55, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या घरच्यांसोबत कपडे खरेदी करण्यासाठी बाहेर गेले. त्या वेळी त्यांचे घर कुलूप लाऊन बंद होते. दरम्यान, दीड तासानंतर फिर्यादी घरी आले असता त्यांच्या घराचा दरवाजाचा कोयंडा तुटलेला दिसला. घरात जाऊन पाहणी केली असता घरातून 39 हजार 850 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 10 हजार रोख रक्कम चोरीला गेल्याचे उघडकीस आले. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button