नियमबाह्य अधिकृत होर्डिंग जास्त घातक ; कागदावर होर्डिंग्सची परवानगी देणाऱ्या अधिका-यांचे महापालिकेत पेव | पुढारी

नियमबाह्य अधिकृत होर्डिंग जास्त घातक ; कागदावर होर्डिंग्सची परवानगी देणाऱ्या अधिका-यांचे महापालिकेत पेव

महापालिकेच्या वेबसाईटनुसार नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये 302 अधिकृत होर्डिंग्स आहेत. पण, प्रत्यक्षात या संख्येपेक्षा जास्त होर्डिंग्स या हद्दीमध्ये आहे. होर्डिंग्सची परवनगी घेण्यासाठी स्ट्रक्चर आणि स्थैर्य प्रमाणपत्र (स्ट्याबिलीटी प्रमाणपत्र), वाहतूक आणि उद्यान विभागाची परवानगी घ्यावी लागते. या सर्व परवानग्या कार्यालयामध्ये बसून दिल्या जातात.

जागेवर प्रत्यक्षात इंजिनिअर किंवा इतर अधिकारी जात नाहीत. कागदावर होर्डिंग्स कुठे उभारणार याचा नकाशा पाहून परवानगी देतात. फक्त कागदावर होर्डिंग्सची परवानगी घेऊन देणाऱ्या लायझनिंग अधिका-याचे पालिकेत पेव फुटले आहे. त्यामुळे होर्डिंग्स जरी अधिकृत असेल, तरी त्याच्या स्ट्रक्चर आणि स्थैर्य प्रमाणपत्राबद्दल शंका असते. अनेक होर्डिंग्स रस्त्यावर आहेत. काही होर्डिंग्सचा भाग रस्त्यावर येत आहे. होर्डिंग्ससाठी मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरीत्या झाडे तोडली जातात. नदीपात्र, तलाव आणि कॅनॉलमध्ये जाहिरातीला परवानगी नाही. तरी, प्रत्यक्षात नदीपात्रामध्ये अनेक होर्डिंग्स आहेत. 40 फुटांपेक्षा जास्त उंच तसेच एकावर एक होर्डि्ंग्स उभारण्यासाठी परवानगी नाही. होर्डिंग्स दर्शनी दिसण्यासाठी 40 फुटांपेक्षा जास्त उंच उभारले जातात. जुन्या इमारतींवर होर्डिंग्स उभारले जात आहेत.

नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील होर्डिंग्सचा सर्व्हे केला जाणार आहे. नियमबाह्य किंवा अनधिकृत होर्डिंग्स आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल.
  – नामदेव बजबळकर, प्रभारी साहाय्यक आयुक्त, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय.

अबब! नगर रस्ता हद्दीत 375 अनधिकृत होर्डिंग

येरवडा : येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सध्यातरी एकही अनधिकृत होर्डिंग शिल्लक नाही. मात्र, नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये सर्वाधिक 375 अनधिकृत होर्डिंग असल्याची माहिती नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत उच्चभ्रू भाग असल्याने या परिसरात होर्डिंगला चांगले भाडे आहे. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगधारकांची संख्या अधिक आहे. केवळ 228 अधिकृत असून, सर्वाधिक 375 अनधिकृत होर्डिंग असल्याची माहिती आकाशचिन्ह विभागाचे कर्मचारी बापू साठे यांनी दिली. यामध्ये सर्वाधिक होर्डिंग वाघोली, खराडी, लोहगाव, विमाननगर परिसरात आहेत. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 109 अधिकृत होर्डिंग असल्याची माहिती आकाशचिन्ह विभागाचे निरीक्षक प्रवीण गाडे यांनी दिली.

वाघोलीत पालिकेचा कारवाईचा धडाका

वाघोली : पुढारी वृत्तसेवा
रावेत, किवळे येथे वादळी वार्‍यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सुस्त प्रशासन जागे झाले असून, वाघोली येथे अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत केवळ एकाच होर्डिंगवर कारवाई करून दिखावा करण्यात आला आहे. ठेकेदार व कामगार यांचेव्यतिरिक्त कोणताही जबाबदार अधिकारी कारवाईदरम्यान उपस्थित नसल्याचे दिसून आले.
रावेत येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर अ‍ॅक्शन मोडवर आलेल्या पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने बुधवारी दिवसभरात महापालिका हद्दीतील 21 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करून ते उतरविले. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले.

पुणे- नगर रोडवर मोठ्या संख्येने अनधिकृत होर्डिंग आहेत. होर्डिंग मालक-चालकांनी होर्डिंग अधिकृत करण्यासाठी मनपाकडे प्रस्ताव पाठवला असला तरी अद्याप तरी ते अधिकृत आहेत असे नाही. कारवाई करणे गरजेचे आहे.
                                                                        – अ‍ॅड. गणेश म्हस्के

बिबवेवाडीत करणार कारवाई : माधव जगताप

बिबवेवाडी : बिबवेवाडीसह पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंगची माहिती त्वरित संकलित केली जाणार आहे. पुढील एक ते दीड महिन्यात अनधिकृत होर्डिंगवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली. होर्डिंगमुळे झालेल्या अपघाताच्या दुर्दैवी घटनेमुळे खडबडून जागे झालेल्या महापालिकेला आता शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाईबाबत कडक धोरण घ्यावे लागणार आहे.

मार्केट यार्ड, बिबवेवाडी परिसरात विविध मोठमोठी विकासकामे सुरू आहेत तसेच शहरातील धान्यबाजार भाजी मार्केट यांची मुख्य बाजारपेठ आहे. बिबवेवाडी परिसरात एकूण 86-87 होर्डिंग हे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून परवानगी घेऊन लावलेले आहेत. परंतु, जवळपास 157 ठिकाणी लहान-मोठे होर्डिंग आहेत. होर्डिंग हे मानवीवस्ती, वाहतूकव्यवस्था व रहिवासी इमारतीवर लावलेले आहेत. ते कोणत्याही क्षणी पडू शकतात व दुर्दैवी घटना घडू शकते. गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रस्त्यावरील होर्डिंगला मजबूत अशा प्रकारचा आधार नाही. तातडीने महापालिकेने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश मोहिते यांनी केली आहे. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे आकाशचिन्ह विभागाचे निरीक्षक म्हणाले की, मी गेल्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वी या विभागात बदलून आलो आहे. पुढील आठ दिवसांमध्ये प्रभागातील अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग तपासून घेईन व पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे अहवाल सादर केला जाईल.

कात्रजमध्ये आकाशचिन्ह विभाग ‘अ‍ॅक्शन मोड’वर!

कात्रज : पुढारी वृत्तसेवा
पुणे शहराच्या दक्षिण उपनगरातील बाह्यवळण महामार्गावर मोठ्या प्रमाणात होर्डिंगचे जाळे पाहायला मिळते. अनेक ठिकाणी महामार्ग, सेवा रस्ते, मुख्य चौक बाधित होतात. अनेक होर्डिंगच्या जवळ हातगाडी, टपर्‍या असल्याने धोकादायक स्थितीत आहेत. दुर्घटनेनंतर आकाशचिन्ह विभाग ‘अ‍ॅक्टिव्ह मोड’मध्ये असून, धडक कारवाई केली जात आहे.
कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 64 अधिकृत होर्डिंग, तर सुमारे 70 होर्डिंगचे प्रस्ताव आले असून, अद्याप मान्यता न मिळाल्याने अनधिकृत आहेत. 64 होर्डिंगची पाहणी केली असल्याचे परवाना निरीक्षक अंकुश गायकवाड यांनी सांगितले. धनकवडी सहकारनगर कार्यालयांतर्गत 37 अधिकृत होर्डिंग आहेत, असे धनकवडीचे निरीक्षक नितीन जगदाळे यांनी सांगितले.

कर्वेनगर भागात टपर्‍या भीतीच्या छायेत

वारजे : पुढारी वृत्तसेवा : वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एरंडवणा, कर्वेनगर, वारजे, शिवणे, उत्तमनगर परिसरात उंच इमारतींवर ठिकठिकाणी काही अधिकृत, तर काही अनधिकृत होर्डिंग यमराज बनून उभे आहेत. या होर्डिंगखाली टपर्‍या, व्यावसायिक दुकाने, हातगाडीचालक आदी व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याचे दै. ‘पुढारी’च्या पाहणीत आढळून आले आहे. गेल्या तीन वर्षांखाली पुण्यात होर्डिंग दुर्घटना घडली होती. त्यानंतर प्रशासनाकडून शहरभर अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा गेल्या दोन दिवसांखाली पिंपरी-चिंचवड परिसरात होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली.
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत जवळपास 95 एकूण होर्डिंग असून, कर्वेनगर ते उत्तमनगरपर्यंत असलेल्या होर्डिंगमधील 5 होर्डिंग अनधिकृत असल्याची माहिती आकाशचिन्ह विभागाने दिली आहे.

धनकवडीत बॅनर हटविण्याचे काम सुरू

धनकवडी : पुढारी वृत्तसेवा : धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आकाशचिन्ह विभागाकडून उपायुक्त जयंत भोसेकर आणि सहायक आयुक्त सुरेखा भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील बॅनर हटवण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये नऊ मोठे पहाड कटर व जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आले. विद्युत खांबावरील लहान-मोठे अनधिकृत 100 पोस्टरदेखील हटवण्यात आले आहेत. तसेच मोठे 40 फ्लेक्स हटवण्यात आले आहेत.
ही कारवाई या पुढेही चालू राहणार असल्याचे आकाशचिन्ह विभागाचे परवाना निरीक्षक नितीन जगदाळे यांनी सांगितले. जगदाळे, महेश पवार, दिनेश नवले यांच्यासह कर्मचार्‍यांनी कारवाई सुरू केली आहे. धनकवडी, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्‍या परिसरात अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात आले असून, आकाशचिन्ह विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे. दुर्दैवाने किवळेतील घटनेची पुनरावृत्ती इतर ठिकाणी होऊ नये म्हणून त्वरित महानगरपालिकेच्या संबंधित कार्यालयाने कारवाई करणे गरजेचे आहे.

नर्‍हेसह महामार्गाच्या बाजूला धोका

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नर्‍हे गावासह मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला जागोजागी अनधिकृत फ्लेक्स उभे आहेत. या होर्डिंगकडे ना महापालिकेचे लक्ष आहे, ना महामार्ग प्रशासनाचे. महापालिका हद्दीत 2485 अधिकृत, तर 2629 अनधिकृत होर्डिंग आहे.
अनधिकृत होर्डिंगची सर्वाधिक संख्या महापालिका हद्दीत समावेश झालेल्या गावांमध्ये आहे. नर्‍हे गावाच्या हद्दीतील गोकुळनगर, श्री कंट्रोट चौक, पारी कंपनी, गंधर्व हॉटेल चौक, भूमकर चौक, वेताळबुवा चौक आदी चौक व त्यांना जोडणार्‍या रस्त्यांच्या परिसरात लहान-मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डिंग उभे आहेत. अनेक ठिकाणी हे होर्डिंग एकखांबी लोखंडी सांगाड्यावर उभे आहेत. तसेच इमारती आणि भिंतींना सांगाडे मारूनही होर्डिंग उभे केले आहेत. याशिवाय मुंबई-बंगळुरू महामार्गाचा दोन्ही बाजूंना रस्त्यालगत आणि इमारतींवर जागोजागी होर्डिंग उभे केले आहेत. यातील कोणत्याही होर्डिंगला महापालिकेकडून परवानगी घेतल्याची नंबरप्लेट लावलेली नाही. अशा अनधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले जात नाही. त्यामुळे भविष्यात धोका होऊ शकतो.

सिंहगड रोड परिसरातील इमारतींवर बॅनर धोकादायक

धायरी : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रोड परिसरात अनधिकृत होर्डिंग दिसून येत नाहीत; परंतु इमारतीच्या टेरेसवर व नागरी वस्तीमध्ये बॅनर, होर्डिंग आहेत. या परिसरात सर्व अधिकृत होर्डिंग आहेत. परंतु बोटावर मोजण्याइतके होर्डिंग परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. येथील होर्डिंग अधिकृत असले, तरी हे नागरी वस्तीत दुकानांच्या छतावर असून, भविष्यात त्यांचा धोका होऊ नये, यासाठी तपासणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, काही होर्डिंगच्या खाली खोल्या व दुकाने आहेत. या अधिकृत होर्डिंगच्या खाली दुकाने, गॅरेज, टपर्‍या नसाव्यात, असा महापालिकेत कोणताही नियम नसल्याची माहिती समोर येत आहे. परंतु या होर्डिंगमुळे नागरिकांना कधीही धोका निर्माण होऊ शकेल, अशी परिस्थिती आहे.

Back to top button