कोल्हापूर : कळंबा जेलमध्ये पुन्हा गांजा, मोबाईल अन् चार्जर! | पुढारी

कोल्हापूर : कळंबा जेलमध्ये पुन्हा गांजा, मोबाईल अन् चार्जर!

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  अभेद्य सुरक्षा व्यवस्थेचा डांगोरा पिटणार्‍या मध्यवर्ती कळंबा कारागृहात सोमवारी सायंकाळी गांजा, दोन मोबाईल हँडसेटसह चार्जर आढळून आल्याने कारागृह प्रशासनांतर्गत खळबळ उडाली आहे. गांजा तस्करीची वरिष्ठस्तरावर दखल घेण्यात आली आहे. सायंकाळनंतर कारागृहांतर्गत सर्वच बरॅकची झाडाझडती घेण्यात आली आहे.

कळंबा कारागृहातील तटाकडील आतील बाजूस शेतीच्या परिसरात पांढर्‍या रंगाच्या कापडाचे पॅकिंग आढळून आले. त्यावर खाकी चिकटटेपने चिकटवलेले कव्हरही आढळून आले. सुरक्षारक्षकांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला.
कापडाचे पॅकिंग उघडले असता त्यामध्ये 98 ग्रॅम वजनाचा गांजासद़ृश पाला, काट्या, काळ्या रंगाचे दोन मोबाईल, पांढर्‍या रंगाचा चार्जर सॉकेट, डाटा केबल असा मुद्देमाल आढळून आला. कारागृह रक्षक विजय बनकर यांनी याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सहायक निरीक्षक संदीप जाधव तपास करीत आहेत.

Back to top button