कोपार्डेचे कुस्ती मैदान इराणचा पैलवान रहेजाने मारले..! | पुढारी

कोपार्डेचे कुस्ती मैदान इराणचा पैलवान रहेजाने मारले..!

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा कोपार्डे (ता. शाहूवाडी) येथे ग्रामदैवत भैरोबा यात्रेच्या निमित्ताने आयोजित कुस्ती मैदानात इराणचा आंतरराष्ट्रीय मल्ल पै. रहेजा इराणी याने महान भारत केसरी पै. प्रवीण भोला याला एकचाक डावावर आस्मान दाखवत प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली. शिवाय स्थानिक मल्ल प्रताप माने, रोहन जाडगे, प्रथमेश पाटील, शुभम माने, पार्थ माने, ओंकार पाटील यांनी प्रतिस्पर्धी मल्लांविरुद्ध चटकदार विजय मिळवून उपस्थित कुस्ती शौकिनांची दाद मिळवली.

प्रारंभी यात्रा कमिटीचे अध्यक्ष शामराव कारंडे, भैरोबा ग्रामविकास ट्रस्टचे अध्यक्ष बाजीराव कळंत्रे, कोल्हापूर पोलीस विजय कारंडे, सरपंच बाळासो पाटील, उपसरपंच विक्रम चौगुले, यात्रा कमिटीचे सदस्य या मान्यवरांच्या उपस्थितीत कुस्ती मैदानाचे पूजन झाले. रात्री उशिरापर्यंत चालले.

महान भारत केसरी पै. प्रवीण भोला विरुद्ध पै. रहेजा इराणी या दिग्गज मल्लांमधील प्रथम क्रमांकाच्या कुस्तीला मान्यवरांनी सलामी दिली. सुरुवातीपासूनच दोन्ही मल्लांनी आक्रमक खेळावर भर देत शौकिनांचे लक्ष वेधले होते. काही क्षण कुस्तीची खडाखडी सुरू राहिली. मात्र, इराणी मल्लाने पै. भोला वर पकड मिळवून त्याला एकचाक डावावर पराभूत केले.

तत्पूर्वी दुसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या कुस्ती लढतीत उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर याने पै. विशाल बेंद्रे याला पराभूत केले. राष्ट्रकुल कुस्ती संकुल (कोल्हापूर) चा पै.अक्षय मंगवडे विरुद्ध पैलवान कौतुक डाफळे यांच्यातील तिसऱ्या क्रमांकाची लढत प्रेक्षणीय झाली. या लढतीत पै. मनगवडे हा गुणावर विजयी ठरला.

मैदानातील अन्य कुस्त्यांमध्ये पै. महारुद्र काळेल, पै. विकास पाटील, अजित पाटील, कर्तार कांबळे अमर पाटील, कुमार पाटील, दत्ता बनकर या मल्लांनी चटकदार विजय मिळवून कुस्ती शौकीनांची मने जिंकली.

कुस्ती मैदानात माजी खासदार राजू शेट्टी, मा. आ. बाबासाहेब पाटील, गोकुळ संचालक कर्णसिंह गायकवाड, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पै.राम सारंग, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक बाजीराव पाटील, रविंद्र साळुंखे, पुण्याचे उद्योगपती बाबुराव सागावकर, हिंदुराव आळवेकर, जिल्हा परिषद माजी सभापती सर्जेराव पाटील, हंबीरराव पाटील, माजी पंचायत समिती सभापती विजय खोत, मंत्रालय उपसचिव भगवान सावंत, अर्थखात्याचे माजी सचिव सुरेश गायकवाड, उद्योगपती धनंजय पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव भेडसे, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, अमरसिंह खोत, नामदेव पाटील, वस्ताद संदीप पाटील आदींनी कुस्ती मैदानाला हजेरी लावली होती. कुस्ती निवेदन व समालोचक ईश्वरा पाटील आणि संतोष कुंभार यांनी केले.

हेही वाचा :  

Back to top button