राज्यातील 522 महाविद्यालयांचा शुल्कवाढ न करण्याचा निर्णय | पुढारी

राज्यातील 522 महाविद्यालयांचा शुल्कवाढ न करण्याचा निर्णय

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 522 व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनी येत्या 2023-24 या शैक्षणिक वर्षात कोणतीही शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. या महाविद्यालयांमध्ये एमबीए अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक आहे. या निर्णयामुळे पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

शुल्क नियामक प्राधिकरणाकडून (एफआरए) इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, अ‍ॅग्रिकल्चर, फाइन आर्ट्स, एमबीए, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अशा प्रमुख अभ्यासक्रमांच्या साधारण 2 हजार 200 महाविद्यालयांचे शुल्क ठरविण्यात येते. ’एफआरए’च्या सदस्यांकडून येत्या 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी शुल्क ठरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार राज्यातील 522 महाविद्यालयांनी नो अपवर्ड रिव्हिजन (म्हणजेच शुल्कवाढ नको) हा पर्याय निवडला आहे. याबाबतची माहिती ’एफआरए’ने प्रसिद्ध केली आहे.

या महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि एमडी/एमएस अभ्यासक्रमांची प्रत्येकी चार महाविद्यालये आहेत. त्यामुळे या सर्व महाविद्यालयांचे शुल्क हे सध्याच्या 2022-23 या चालू शैक्षणिक वर्षाप्रमाणे राहणार आहे. या निर्णयामुळे सततच्या शुल्कवाढीमुळे त्रासलेल्या विद्यार्थी आणि पालकांना काहीसा दिलासा मिळाला असून, त्यांचे वर्षाला सरासरी 5 ते 50 हजार रुपये वाचणार आहेत.

ही रक्कम विद्यार्थ्यांना त्यांना दैनदिन खर्च भागविण्यासाठी उपयोगी पडू शकते. विद्यार्थी आणि पालकांना शुल्कवाढ न करणार्‍या महाविद्यालयांची यादी एफआरएच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. महाविद्यालयांमध्ये रिक्त राहणार्‍या जागा आटोक्यात राहाव्यात, यासाठी राज्यातील शिक्षण संस्थांकडून शुल्कवाढ केली जात नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाविद्यालय आणि अभ्यासक्रम
प्रमुख अभ्यासक्रम महाविद्यालयांची संख्या
एमबीए 91
बी-फार्म 68
बीई 67
एमई 39
एमसीए 30
विधी तीन वर्षे 30
विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांची महाविद्यालये 87
कृषी अभ्यासक्रमांची महाविद्यालये 22

Back to top button