व्यक्‍तिचित्र : मोबाईलचा ‘बाप’माणूस | पुढारी

व्यक्‍तिचित्र : मोबाईलचा ‘बाप’माणूस

3 एप्रिल 1973. बेल लॅब्जच्या विभागप्रमुखांचा म्हणजेच जोल एन्गेल यांचा टेलिफोन खणाणला. फोन उचलल्यावर पलीकडून जवळजवळ एक विजयी आरोळी ठोकली गेली. ‘जोल! मी तुला एका खर्‍याखुर्‍या सेल्युलर टेलिफोनवरून कॉल केलाय आणि हो, साधासुधा टेलिफोन नाही, तर एक असा टेलिफोन जो मी माझ्या हातात घेऊन कुठंही जाऊ शकतो!’

या ऐतिहासिक कॉलने सगळीच गणितं बदलली. पलीकडून येणारा तो आवाज जोल यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्याचा म्हणजेच मार्टिन यांचा होता. ‘मोटोरोला’साठी संपर्क विभागप्रमुख म्हणून काम पाहणार्‍या मार्टिन कूपर यांनी जगातला सगळ्यात पहिला मोबाईल फोन बनवला होता आणि त्यावरून सगळ्यात पहिला कॉल आपला कट्टर प्रतिस्पर्धी जोल एन्गेलला केला होता!

जवळपास 2 किलो वजनाचा हा फोन पूर्ण चार्ज होण्यासाठी दहा तास वाट बघावी लागत होती. इतका वेळ चार्ज होऊनही फोन जेमतेम अर्धा तासच टिकू शकत होता. साधारणतः, विटेएवढ्या आकाराच्या या खोक्याने गेल्या पाच दशकांत बरीच प्रगती केलीय. सध्या थोडंथोडकं नाही तर तब्बल 91 टक्क्यांहून अधिक वजन या फोनने कमी केलंय.

आताचे फोन मोबाईलऐवजी स्मार्टफोन म्हणून ओळखले जात असले, तरी या सर्वांची जातकुळी एकच. सध्या भारतात ‘5-जी’ म्हणजेच पहिल्या मोबाईलची पाचवी पिढी कार्यरत आहे. अगदी तासाभरात पूर्णतः चार्ज होणार्‍या या अत्याधुनिक स्मार्टफोनमधे आता दीड-दोन दिवसांपर्यंत पुरेल एवढ्या क्षमतेची बॅटरी असते. तो वजनाने हलका आणि आकाराने लहान झाल्याने त्याच्या वापरकर्त्यांमध्येही लक्षणीय वाढ झालीय.

वापरायला आणि बाळगायला सोपा असलेला मोबाईल आता एक दैनंदिन गरजेचं यंत्र बनलाय. कॅलेंडर, कॅल्क्युलेटरसारख्या रोजच्या जगण्यातल्या गोष्टींपासून कॅमेर्‍यासारख्या एकेकाळी महागड्या, चैनीच्या वाटणार्‍या गोष्टींना या इवल्याशा मोबाईलने स्वतःमध्ये सामावून घेतलंय. या मोबाईलच्या रूपाने जणू सारं जगच आपल्या खिशात आणि बोटांच्या टोकावर आलंय, असं चित्र यशस्वीरीत्या निर्माण झालंय.

गेल्या पाच दशकांत मोबाईलने अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजांच्या यादीत स्वतःला बसवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. बघायला गेलं तर मानवी जीवनात सुलभता आणणार्‍या इतर यंत्रांसारखंच एक साधं यंत्र म्हणून मोबाईलचा उल्लेख केला जाऊ शकतो; पण या यंत्राचा वापर आता इतका वाढलाय की, तो आता मानवी शरीराचाच एक अविभाज्य अवयव होऊन बसलाय.

हा मोबाईल कधी आपलं अंग फुगवून टॅब्लेटच्या स्वरूपात येतोय तर कधी स्मार्टवॉचच्या आडून आपल्या मनगटावर रुतून बसतोय. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत मोबाईलची प्रचंड क्रेझ आहे. नुकतीच रांगू लागलेली बाळंही समोर फोन ठेवून, त्यात यूट्यूब चालू करून दिल्याशिवाय काही खात नाहीत, हे घराघरातलं चित्र बनलंय. फक्त संवादासाठी बनवलेला मोबाईल लोकांच्या करमणुकीचा, व्यवसायाचा, अभ्यासाचा एक भाग बनलाय.

मोबाईल आता पन्नाशीत पोहोचलाय, याचं एक बाप म्हणून कूपर यांना कौतुक असणं साहजिकच आहे; पण त्याचा गरजेपेक्षा जास्त होणारा वापरही त्यांना खटकतोय, हे विशेष. मोबाईल कसा वापरायचा, हे लोकांना अजूनही नीट कळलेलंच नाही, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. वयाची शंभरी गाठण्यापासून अवघी काही पावलं दूर असलेले कूपर आपल्या पतवंडांना मोबाईलच्या आहारी गेलेलं पाहून हळहळतात.

कूपर स्वतः अ‍ॅपल आयफोनचं अगदी अपटूडेट मॉडेल वापरतात. इतकंच काय, तर त्यांच्याकडे स्मार्टवॉचसुद्धा आहे. बाजारात जे जे नवं तंत्रज्ञान येतंय, ते ते आत्मसात करण्याची त्यांची इच्छाशक्ती आजही अगदी तशीच टिकून आहे; पण तंत्रज्ञानाचा वापर करणं आणि त्याच्या आहारी जाणं यातला फरक पिकल्या केसांच्या कूपर यांनी बरोबर ओळखलाय.

कूपर यांना मोबाईलचा अतिवापर योग्य वाटत नसला, तरी ते त्यांच्या काही ‘खडूस’ समवयिनांसारखे नकारात्मक द़ृष्टिकोन ठेवत नाहीत. प्रत्येक पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा स्मार्ट आहे आणि भविष्यात एक तरी पिढी अशी येईलच जिला मोबाईलचा प्रभावी वापर करता येईल, असा दुर्दम्य आशावाद हा मोबाईलचा ‘बाप’माणूस ‘वायन’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त करतो.

प्रथमेश हळंदे

Back to top button