Covid-19 cases | देशात २४ तासांत कोरोनाचे ६,१५५ नवे रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट ५.६३ टक्क्यांवर | पुढारी

Covid-19 cases | देशात २४ तासांत कोरोनाचे ६,१५५ नवे रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट ५.६३ टक्क्यांवर

पुढारी ऑनलाईन : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे दैनंदिन रुग्ण ६ हजारांवर आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६,१५५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या ३१,१९४ वर पोहोचली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ५.६३ टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेत कोरोनास्थितीचा आढावा घेतला. कोरोना संसर्गाचा वाढता प्रकोप लक्षात घेता सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. या दरम्यान, कोविड चाचणी आणि जिनोम सिक्वेन्सिंगसह कोविड नियमांबाबत जागृती वाढविण्याबाबत चर्चा झाली. आपण सतर्क राहिले पाहिजे आणि कोरोनाबाबत कोणतीही अनावश्यक भीती पसरवण्याचे टाळले पाहिजे, असे मांडविया यांनी म्हटले आहे. (Covid-19 cases)

सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यातील कोविड परिस्थिती लक्षात घेता आरोग्य सुविधा आणि पायाभूत सुविधांबाबत आढावा बैठक घेण्याची सूचना करण्यात आली आहे. १० आणि ११ एप्रिल रोजी कोविड संदर्भात संपूर्ण देशात मॉक ड्रिल होईल. ज्यात सर्व आरोग्यमंत्र्यांनीदेखील हॉस्पिटलला भेट द्यावी, असेही मांडविया यांनी सांगितले आहे.

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीमागे XBB.1.16

भारतातील रुग्णसंख्या वाढीमागे ओमायक्रॉनचा XBB.1.16 हा व्हेरिएंट कारणीभूत आहे. पुढील काही दिवसांत या व्हेरिएंटचा जगभरात फैलाव होईल. त्याची पुनरुत्पादक संख्या XBB.1 आणि XBB.1.5 पेक्षा अनुक्रमे १.२७ आणि १.१७ पट जास्त आहे. XBB.1.16 व्हेरिएंट नजीकच्या काळात जगभरात पसरेल, असे नवीन एका अभ्यासातून समोर आले आहे.

आठवड्याभरात २९ हजार ३१७ कोरोनाबाधितांची भर

देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठवड्याभरात देशात तब्बल २९ हजार ३१७ कोरोनाग्रस्तांची भर पडली. तर, ६२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. गुरूवारी दिवसभरात ६ हजार ५० कोरोना रुग्ण आढळले. तर, १४ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, २ हजार ७१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बुधवारी दैनंदिन कोरोनाग्रस्तांची संख्या ५ हजार ३३५ नोंदवण्यात आली होती. शुक्रवारी दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत ७१५ (१३ टक्के) ने वाढ नोंदवण्यात आली. देशाचा दैनंदिन कोरोनासंसर्ग दर ३.३९ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ३.०२ टक्के नोंदवण्यात आला. तर, कोरोनामुक्तीदर ९८.९५ टक्के नोंदवण्यात आला.

महाराष्ट्रात रुग्णवाढ

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाची चिंता वाढली आहे. शुक्रवारी राज्यात ९२६ नवीन कोविड रूग्णांची नोंद करण्यात आली. तर ३ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. राजधानी मुंबईत २७६ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गुरुवारी ८०३ नवीन कोरोना रूग्ण आढळून आले होते. तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

देशातील कोरोनाबाधितांचा वाढता आलेख

दिनांक… दैनंदिन… रुग्ण मृत्यू

१) १ एप्रिल… २,९९४… ९
२) २ एप्रिल… ३,८२४… ४
३) ३ एप्रिल…. ३,६४१…११
४) ४ एप्रिल….३,०३८…७
५) ५ एप्रिल….४,४३५…११
६) ६ एप्रिल… ५,३३५…६
७) ७ एप्रिल… ६,०५०…१४
८) ८ एप्रिल… ६,१५५…११

हे ही वाचा :

Back to top button