दोन्ही डोस घेतलेल्या ९० टक्के नागरिकांना कोरोनाची लागण | पुढारी

दोन्ही डोस घेतलेल्या ९० टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाही कोरोनाची लागण होत असल्याची माहिती बीएमसीच्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. अशा रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांमध्ये तब्बल ९० टक्के आहे. त्यामुळे लोकांनी लवकरात लवकर तिसरा म्हणजेच प्रीकॉशनरी डोस घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. १६ जानेवारी २०२१ रोजी मुंबईत लसिकरण सुरु झाले. त्यानंतर सुमारे ९० लाख लोकांना दोन्ही डोस देण्यात आले. जानेवारी २०२२ पासून तिसरा डोस देण्यास सुरूवात झाली. त्यानंतर कोरोना आटोक्यात आला होता.

मंगळवारी २१८ रुग्णांची नोंद

मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांनी द्विशतक पार केले आहे. मंगळवारी तब्बल २१८ रुग्णांची नोंद झाली. यातील २१ जणांना ताप खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर यापैकी ५ जणांना ऑक्सिजनची गरज भासली. संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन करूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी भीतीही आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आली. संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यावर पालिकेने विशेष भर दिला आहे. एका रुग्णामागे संपर्कात आलेल्या किमान १० ते १२ नागरिकांचा शोध घेतला जात आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले. मात्र दररोज दीड हजाराच्या आतच चाचण्या होत आहेत. दरम्यान रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे रुग्णांची संख्याही वाढू लागली असून सध्या १ हजार १६२ सक्रिय रुग्ण आहेत.

९३ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत

मुंबईत १ एप्रिल रोजी १७२ रुग्णांचा नोंद झाली. त्यापैकी १६० रुग्णांमध्ये कोणतीली लक्षणे नव्हती. म्हणजेच तब्बल ९३ टक्के संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. आतापर्यंत ८३ रुग्णांना कोव्हिड सेंटरमध्ये भरती करावे लागले. त्यापैकी केवळ ४ रुग्णांना ऑक्सिजन लावाला लागला. कोरोनावर मात करुन १२३ रुग्ण बरे झाले आहेत. विशेष म्हणजे या काळात एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. १७ मार्चला मुंबईत २०० रुग्णसंख्या होती. त्यानंतर २२ मार्चला रुग्णांनी ३०० चा टप्पा गाठला. तर २६ मार्चला ५५८ कोरोना रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या वाढली असली तरी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ९२ टक्के एवढी आहे. १ मार्च ते २ एप्रिल या दरम्यान म्हणजेच ३३ दिवसांमध्ये ४२, ९१३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. दररोज सुमारे १३०० कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत, अशी माहिती बीएमसीने दिली आहे.

मुलांना धोका जास्त

कोरोनाच्या नव्या व्हेरायंटचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी तातडीने लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. या व्हेरायंटमुळे गंभीर आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असली तरी दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्याचा भार वैद्यकीय पायभूत सुविधांवर पडणार आहे. याची नोंद घेण्याची गरज आहे.

Back to top button