खंडाळ्यातून अपहरण झालेल्या युवकाची बारामतीत सुटका | पुढारी

खंडाळ्यातून अपहरण झालेल्या युवकाची बारामतीत सुटका

बारामती : पुढारी वृत्तसेवा

खंडाळा ( जि. सातारा ) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेल्या युवकाची बारामती तालुका पोलिसांनी माळेगाव बुद्रुक येथे सुटका केली. अनिकेत मिलिंद पिके ( वय ३१, रा. कदम पॅलेस, जुना वासुंबे रस्ता, विटा, ता. खानापूर, जि. सांगली ) असे सुटका केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याला खंडाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान या प्रकरणी चौघांविरोधात खंडाळा पोलिस ठाण्यात जबरीने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश रघुनाथ टेंगले (वय २८) व अल्ताफ अब्बास इनामदार ( वय ४०, दोघे रा. म्हसोबाचीवाडी, पणदरे, ता. बारामती ), राहुल भरत सोनवणे ( वय ३३ ) व कुलदीप चंद्रकांत जावळे ( वय २४, दोघे रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तालुका पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत खंडाळा पोलिसांकडे दिले.

हेही वाचा : तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार; नराधम तरुणाला अटक

बारामती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण यांनी याबाबत माहिती दिली. शुक्रवारी ( दि. ८ ) सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान खंडाळा बसस्थानकाजवळील पूजा बारमधून आकाश टेंगले याने तीन साथीदारांसह पैशाच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारातून आत्ताच्या आत्ता सव्वा तीन लाख रुपये द्यायचे नाही तर अनिकेतला उचलून घेवून जाणार अशी धमकी फिर्यादीला दिली.

त्यानुसार अनिकेत याला एसयूव्ही मोटारीतून अपहरण करण्यात आले. खंडाळा पोलिसांकडून एमएच १४ डीएन ०१२६ या वाहनाची माहिती तालुका पोलिस ठाण्याला देण्यात आली. त्यानुसार पोलिस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे, पोलिस नाईक चांदणे, प्रशांत राऊत, दीपक दराडे यांनी नाकाबंदी करून ही गाडी अडवत अपहरण झालेल्या युवकाची सुटका केली.

Back to top button