चंद्रपूर : मोहफूल वेचायला गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्यात मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : मोहफूल वेचायला गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्यात मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मोहफूल वेचायला गेलेल्या एका इसमाचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी (4 एप्रिल) ला सकाळच्या सुमारास घडली. नागभिड जवळील तुकूम येथील रहिवासी अरूण रंदये (55) या व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला. नागभीड बिटातील कक्ष क्रमांक 605 मध्ये ही घटना उघडकीस आली आहे.

उन्हाळा सुरू झाल्याने मोहफूल वेचणीला सुरूवात झाली आहे. आर्थिक मिळकतीचे साधन म्हणून जंगला लगतच्या ग्रामीण भागातील महिला पुरूष मोहफूल वेचून मिळणारा पैसा उदरनिर्वाहाकरिता खर्ची घालतात. नागभीड जवळील तुकूम या गावातील अरूण रंदये हा व्यक्ती मंगळवारी नागभीड बिटातील कक्ष क्रमांक ६०५ मध्ये सकाळी मोहफूल वेचायला गेला होता. दररोज मोहफुल वेचून घरी येणारे व्यक्ती परत आले. परंतु हा अरूण रंदये हा दुपारी तीन वाजतापर्यंत घरी परत आला नाही. त्यामुळे त्याच्या भावाने जंगलात जावून बघितले असता काही ठिकाणी रक्त आढळून आले. त्यामुळे तो घाबरून घरी परत आला. त्याने गावात ही घटना सांगीतल्या नंतर नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ज्या ठिकाणी रक्त आढळून आले होते त्या ठिकाणाजवळ शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती नागभिड वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. सदर व्यक्तीचा मृत्यू वाघाच्या हल्यात झाल्याने रंदये कुटूंबियांतील घरचा कर्ता गेल्याने दु:खाचे डोंगर कोसळले आहे. त्याच्या पश्चात पत्नी व मुलगी आहे. मुलीचा लग्न झाल्याने ती सासरी आहे. पूर्वी तो वनविभागात चौकीदार म्हणून कार्यरत होता. परंतु तो वेळोवेळी कामावर जात नसल्याने त्याला कामापासून मुकावे लागले होते. त्यामुळे सध्या मिळेल ते काम करीत होता. उन्हाळ्यात तो संसाराच्या आर्थीक मिळकतीसाठी मोहफुल वेचायला जात होता.

Back to top button