केरळच्या 11 वर्षीय मुलीने विकसित केले अनोखे अ‍ॅप | पुढारी

केरळच्या 11 वर्षीय मुलीने विकसित केले अनोखे अ‍ॅप

वायनाड : आपल्या देशात गुणवत्ता ठासून भरली आहे. गरज आहे ती या गुणवत्तेला योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळण्याची. आता हेच पाहा ः केरळच्या एका 11 वर्षीय मुलीने अक्षरशः चमत्कार घडविला आहे. तिने 6 महिन्यांच्या संशोधनानंतर एक नवे अ‍ॅप विकसित केले असून यामुळे डोळ्यांशी संंबंधित आजारांची माहिती मिळवणे सुलभ होणार आहे. या मुलीचे नाव आहे लीना रफिक. तिने आयफोनच्या मदतीने स्कॅनिंग प्रोसेसवर काम केले आहे. हे अ‍ॅप आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे तयार करण्यात आले आहे. लवकरच या अ‍ॅपला अधिकृत परवानगी मिळू शकेल, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर याचा व्हिडीओ शेअर केला जात आहे. या अ‍ॅपद्वारे मोतीबिंदूसह डोळ्याच्या विविध आजारांची माहिती कळू शकणार आहे. मुख्य म्हणजे हे अ‍ॅप पूर्णपणे स्वदेशी आहे. ते बनवण्यासाठी डोळ्याची स्थिती, कॉम्प्युटर व्हिजन, अल्गोरिदम, मशीन लर्निंग मॉडल्स आदीबाबतची माहिती तिने जमा केली. नंतर त्यावर आपण संशोधन केले, असे लीनाने म्हटले आहे.

विशेष म्हणजे तिची मोठी बहीण हानाने सोशल मीडियावर अवघ्या 9 व्या वर्षी एक स्टोरी टेलिंग अ‍ॅप बनवून सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते. लीना रफिकने आयफोनचा वापर करून एक जबरदस्त स्कॅनिंग अ‍ॅप तयार केल्याबद्दल अनेक यूजर्संनी या नवीन कामगिरीसाठी लीनाचे अभिनंदन केले आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते ते खरे आहे. त्यामुळेच लीनाचे सगळीकडे कौतुक होत आहे.

Back to top button