नारायणगावात विक्रेते, व्यापार्‍यांसाठी शेड | पुढारी

नारायणगावात विक्रेते, व्यापार्‍यांसाठी शेड

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : नारायणगावमधून जुन्नरला जाणार्‍या जुन्या रस्त्यालगत आठवडे बाजारात भाजप नेत्या आशा बुचके यांच्या प्रयत्नातून 20 लाख रुपये खर्च करून विक्रेत्यांसाठी शेड उभे केल्याने विक्रेते व व्यापार्‍यांचे उन्हापासून संरक्षण होत आहे.
नारायणगावात या ठिकाणी शनिवारी आठवडे बाजार भरतो. विक्रेत्यांसाठी याठिकाणी पूर्वी ओटे बनवले होते. मात्र, कालांतराने त्यांची दुरवस्था झाली. तसेच काही विक्रेते नदीलगत अरुंद व अस्वच्छ जागेत बसत होते.

त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत होता. माजी सरपंच योगेश पाटे यांनी ही बाब आशा बुचके यांच्या निदर्शनास आणून दिली. बुचके यांनी त्वरित नागरी सुविधांतर्गत या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊन बसण्यासाठी ओटे, मोठे पत्राशेड बांधून दिले आहे. परिणामी, आता शनिवारी भरणारा आठवडे बाजार हा सावलीत भरू लागला आहे.

विक्रेते, व्यापार्‍यांबरोबरच नागरिकांना स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने असुरक्षित ठिकाणी लघुशंकेसाठी जावे लागत होते. ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन या ठिकाणी अद्यावत स्वच्छतागृह व शौचालय उभे केले आहे. आठवडे बाजाराला जाणार्‍या रस्त्याची अष्टविनायक जोडमार्गांलगत बेल्हेकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.द्वारे रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. त्याचाही फायदा होत आहे. सुविधांबाबत विक्रेते व व्यापा-यांनी ग्रामपंचायचे आभार मानले.

आठवडे बाजारात ग्रामपंचायतद्वारे अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. पुढेही करणार आहोत. भविष्यकाळात या रस्त्यालगत भैरवनाथ मंदिरापर्यंत विक्रेत्यांना बसण्याची सुविधा करणार आहे.
                                         योगेश पाटे, माजी सरपंच, नारायणगाव.

Back to top button