स्वतःलाच खाणारा जीव! | पुढारी

स्वतःलाच खाणारा जीव!

वॉशिंग्टन : अनेक प्रजातींमधील प्राण्यांचा प्रजननानंतर मृत्यू होतो. काही प्रजातींमध्ये मादी नराला मारूनही टाकते. ऑक्टोपसमध्ये तर एक विचित्र वर्तन दिसून येते. बहुतांश प्रजातींच्या मादी ऑक्टोपस त्यांनी घातलेली अंडी फुटून पिल्ली बाहेर येण्याची वेळ आली की उपोषण सुरू करतात. त्या आपल्या भ्रूणांवरील सुरक्षात्मक कवच सोडून देतात आणि स्वतःला मारण्यासाठी प्रवृत्त होतात. आपले शरीर त्या एखाद्या सागरी खडकाला धडकवतात, आपली त्वचा फाडून घेतात. इतकेच नव्हे तर अश वेळी अनेक मादी ऑक्टोपस आपल्या भुजाही खातात. संशोधकांनी अशा रसायनांचा शोध लावला आहे जी मादी ऑक्टोपसमध्ये अशी आत्मघातकी वृत्ती निर्माण करतात.

अंडी दिल्यानंतर मादी ऑक्टोपसच्या शरीरात कोलेस्टेरॉलची निर्मिती आणि उपयोग यामध्ये परिवर्तन होते. हे असंतुलन ऑक्टोपसच्या शरीरात स्टेरॉईड हार्मोनचे उत्पादन वाढवते. या रासायनिक बदलामुळे ऑक्टोपस बेचैन होतात आणि स्वतःला नष्ट करण्यासाठी प्रवृत्त होतात. वॉशिंग्टन विद्यापीठातील मनोविज्ञान आणि जैवविज्ञानाचे सहायक प्राध्यापक जेड यान वांग यांनी सांगितले की काही बदल अशा प्रक्रियांकडे इशारा करतात जे सर्वसाधारणपणे अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या आयुर्मानाशी संबंधित आहेत.

मादी ऑक्टोपसमधील पिल्लांच्या जन्मानंतर मरण्याचे वाढते प्रमाण वैज्ञानिकांच्या कुतुहलाचा विषय बनले होते. त्या असे का करतात याचे अनेकांना गूढ वाटत होते. शिकार्‍यांना तिच्या अंड्यांपासून दूर करण्यासाठी असे केले जात असावे असेही अनेकांना वाटत होते. आईच्या शरीरातील पोषक घटक पाण्यात मिसळून त्याचा लाभ अंड्यांमधील भ्रूणांना मिळावा असाही उद्देश असावा असा कयास होता. सर्वात अधिक शक्यता त्यांचे मरणे पिल्लांना जुन्या पिढीपासून वाचवण्यासाठी असावे ही होती.

ऑक्टोपस आपल्याच प्रजातीच्या जीवांनाही खातात. त्यामुळे पिल्लांच्या तुलनेत प्रौढ ऑक्टोपसची संख्या वाढली तर ते एकमेकांच्या पिल्लांनाही खाऊन टाकू शकतात. 1977 मध्ये ब्रँडिस युनिव्हर्सिटीतील मनोवैज्ञानिक जेरोम वोडिंस्की यांनी केलेल्या संशोधनात आढळले होते की त्यांच्या या आत्मविनाशाच्या मागे ऑप्टिक ग्लँडचा समावेश आहे. ऑक्टोपसच्या डोळ्यांजवळील या ग्रंथी असून त्या माणसातील पिट्युटरी ग्रंथींसारख्या असतात. वोडिंस्की यांना आढळले की जर ऑप्टिक ग्रंथींच्या नसा कापल्या तर मादी ऑक्टोपस अंडी सोडून देते आणि पुन्हा अन्नभक्षण सुरू करते. अशावेळी ती चार महिने ते सहा महिनेही जिवंत राहू शकते.

Back to top button