पिंपरी : लावणी जपण्यासाठी महोत्सव घेणार : मुनगंटीवार | पुढारी

पिंपरी : लावणी जपण्यासाठी महोत्सव घेणार : मुनगंटीवार

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : लावणी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव, वारसा आहे. लावणी उत्तम ऊर्जा देणारी पारंपरिक कला आहे. ही कला जपली जाईल. आमदारांना प्रत्येक जिल्ह्यात लावणी महोत्सव घेण्यास सांगू, ही पारंपरिक लावणी जपण्यासाठी मोठा लावणी महोत्सव घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

लावणी कला पुनर्जीवित करण्यासाठी, पारंपरिक लावणी जपण्यासाठी आमदार उमा खापरे आणि महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय लावणी महोत्सवाच्या समारोप व बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
याप्रसंगी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्कनेते, आमदार सचिन अहिर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, आमदार महादेव जानकर, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते.

सोनाली जळगावकर यांचा गौरव
लावणी स्पर्धेत कैरी पाडाची या संघाने प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले. राजसा तुम्हासाठी, साज आणि जल्लो अप्सरांचा यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. सर्वोत्कृष्ट नृत्यांगना म्हणून सोनाली जळगावकर यांचा गौरव केला. ज्येष्ठ नृत्यांगना लीला गांधी, माया जाधव, ज्येष्ठ कथ्थक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते, नृत्यांगना संजीवनीमुळे नगरकर व सीमा पोटे नारायणगावकर यांना पुरस्कार देऊन गौरविले.

रंगला सवाल-जवाब
अंतिम फेरीत आलेल्या मकैरी पाडाचीफ, मराजसा तुम्हासाठीफ, मसाजफ आणि मजल्लोष अप्सरांचाफ या चार संघामध्ये सवाल-जवाब झाला. साज ग्रुपचे शाहीर श्रीकांत रेणके – कवठेकर यांनी पोत्या पुराणांचा आधार घेऊन दोन सवाल दिले. जल्लोष अप्सरांच्या ग्रुपला दोनही सवालांचे जवाब देता आले नाहीत. प्रेक्षक सुनंदा पाटील, ममता भिसे यांनी उत्तर दिले. त्यात साज ग्रुप विजयी झाला. त्यानंतर मी राजसा तुम्हासाठी आणि कैरी मी पाडाची या ग्रुपमध्ये जुगलबंदी झाली. मी राजसा तुम्हासाठी ग्रुपने पहिला सवाल दिला. त्याचा जवाब कैरी मी पाडाची ग्रुपला देता आला नाही. महिला प्रेक्षक निशा कदम यांनी उत्तर दिले. कैरी मी पाडाची ग्रुपच्या सवालाचे उत्तर मी राजसा ग्रुपने दिले.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, ‘मराठी सांस्कृतिक शास्त्रात उत्तम ऊर्जा देणारा लावणी हा एक प्रकार आहे. लावणी ही मराठी मनाचे वैभव आहे.’ सांस्कृतिक विभागाचे राजदूत बनून उमा खापरे आणि सुलभा उबाळे या दोघींनी लावणी महोत्सव घेतला. पोटाची भूक ही पाकपदार्थ, पाकशास्त्राने भागते. त्याचप्रमाणे मनाची भूक आणि मनाचे समाधान हे सांस्कृतिक शास्त्रानेच करायचे असते.

सुरेखा पुणेकर यांनी लावणी सातासमुद्रापार नेली. नटरंगीनारचे विदेशात शो झाले. असा कलाकार आमदार झाला. तर लावणी कलेला राजाश्रय मिळेल. त्यामुळे पुणेकर यांना विधान परिषदेत पाठवावे, अशी मागणी आमदार जाणकर यांनी केली. आमदार अहिर म्हणाले, ‘लावणीची परंपरा जपण्यासाठी असे महोत्सव जिल्ह्याजिल्ह्यांत व्हायला पाहिजेत. लावणीचे जतन करण्यासाठी अ‍ॅकडमी होणे गरजेचे आहे.’

Back to top button