भारताची गगनभरारी | पुढारी

भारताची गगनभरारी

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) एलव्हीएम 3 – एम 3 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून मोठी अवकाशभरारी घेतली आहे. याद्वारे अवकाशात एकाचवेळी 36 उपग्रह स्थापित करण्यात आले असून, या कामगिरीमुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. भारताच्या महत्त्वाकांक्षी अशा गगनयान मोहिमेलाही त्यामुळे बळ मिळाल्याचे मानले जाते. ब्रिटनच्या नेटवर्क अ‍ॅक्सेस असोसिएटस् लिमिटेड (वनवेब ग्रुप कंपनी) ने लो-अर्थ ऑर्बिटमध्ये 72 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या न्यूस्पेस इंडियाशी केलेल्या करारानुसार 23 ऑक्टोबर 2022 मध्ये इस्रोने ‘वन वेब’चे 36 उपग्रह प्रक्षेपित केले होते. उर्वरित 36 उपग्रहांचा दुसरा ताफा रविवारी सकाळी तामिळनाडूतील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसर्‍या तळावरून प्रक्षेपित करण्यात आला. या मोहिमेने अवकाशात स्थापित केलेल्या उपग्रहांचे एकूण वजन (पेलोड) 5,805 किलो आहे.

‘इस्रो’च्या मोहिमा हा देशवासीयांच्याच नव्हे, तर जगभरातील लोकांच्या कुतूहलाचा विषय असतो. त्यासंदर्भातील तपशील तांत्रिक स्वरूपाचे असले तरी ते नीट समजून घेतल्याशिवाय या मोहिमांचे नेमके महत्त्व लक्षात येत नाही. सर्वच क्षेत्रांत राजकारणग्रस्तता वाढली असताना आणि राजकारणाभोवती फिरणार्‍या गोष्टींना महत्त्व मिळत असल्यामुळे अशा मोहिमा उपेक्षित राहतात आणि त्यामागे काम करणार्‍या शेकडो वैज्ञानिकांचे परिश्रमही दुर्लक्षित राहतात. त्यासाठी या मोहिमांचे काही तपशील जाणून घेणे आवश्यक असते. उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 43 मीटर उंचीच्या इस्रोच्या रॉकेटने 36 उपग्रहांना एकत्र घेऊन उड्डाण केले. या मोहिमेला एलव्हीएम3-एम3/वनवेब इंडिया-2 असे नाव देण्यात आले.

उड्डाणानंतर प्रक्षेपणास्त्राने सर्व उपग्रह क्रमाक्रमाने त्यांच्या नियोजित कक्षांमध्ये प्रस्थापित केले. त्यामुळे मोहिमेची यशस्वी सांगता झाली. प्रक्षेपित केलेले सर्व उपग्रह नियोजित कक्षेत स्थिर झाले असून, त्यांच्याशी संपर्कही प्रस्थापित करण्यात आला असल्याचे ‘इस्रो’ने जाहीर केले आहे. ‘इस्रो’ची व्यावसायिक उपशाखा असलेल्या ‘न्यू स्पेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ची ही दुसरी यशस्वी मोहीम. जागतिक दळणवळण उपग्रहांच्या प्रक्षेपणामध्ये भारताचे वाढते महत्त्व या मोहिमेमुळे अधोरेखित झाले असून, हा आत्मनिर्भरतेचा खरा प्राण आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचे कौतुक केले, यावरून देशासाठी ही मोहीम किती महत्त्वाची आहे, हे लक्षात येते. त्याचमुळे भारताने अवकाश संशोधन क्षेत्रात घेतलेली ही झेप जगभरातील अभ्यासकांच्या कौतुकाचा विषय ठरणे साहजिक आहे.

कोणत्याही देशाची प्रगती केवळ संबंधित देशाच्या आर्थिक स्थितीवरून मोजली जात नाही. इतरही महत्त्वाची परिमाणे असतात आणि वैज्ञानिक प्रगती हे त्यातील सर्वाधिक महत्त्वाचे परिमाण आहे. लोकसंख्येने प्रचंड असलेल्या आणि अनेक समस्यांची आव्हाने असलेल्या भारताने विज्ञान क्षेत्रातही जागतिक पातळीवर अभिमानाने मिरवावी, अशी कामगिरी केली आहे. त्यामध्ये ‘इस्रो’चे योगदान फार मोठे आहे. अवकाश विज्ञान व तंत्रज्ञानाचा देशाच्या विकासासाठी कसा उपयोग करता येईल, हा उद्देश समोर ठेवून ‘इस्रो’चे सुरू असलेले काम दखलपात्र आहे. 1969 मध्ये स्थापन झालेल्या ‘इस्रो’ने विविध प्रकारचे कृत्रिम उपग्रह आणि त्याअनुषंगाने प्रणाली विकसित केल्या. 1975 मध्ये ‘आर्यभट्ट’ या कृत्रिम उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून अवकाश कार्यक्रमात पदार्पण केले, तिथपासून सुरू झालेला प्रवास आजच्या मोहिमेपर्यंत आला.

ब्रिटनची वनवेब लिमिटेड ही अंतराळ क्षेत्रात कार्यरत असलेले जगभरात दूरसंचार जाळे असलेली कंपनी. ती सरकारी सेवा आणि उद्योगांना इंटरनेट सेवा प्रदान करते. भारती एंटरप्रायझेस ही ‘वन वेब’मधील प्रमुख गुंतवणूकदार आहे. ‘इस्रो’ व त्याची व्यावसायिक शाखा ‘एनएसआयएल’सोबत भागिदारी असल्याने 2023 पर्यंत भारतात दूरसंचार सेवा प्रदान करणार असल्याचे ‘वन वेब’ने म्हटले आहे. गगनयान मोहीम ही भारताची एक महत्त्वाकांक्षी मोहीम. भारताच्या मानवी दलाला अंतराळात पाठविण्यासाठी ती आखण्यात आली असून, यांतर्गत तीन दिवसांसाठी तीन अवकाशवीर चारशे किलोमीटर उंचीवर जातील आणि पुन्हा सुरक्षित नियोजित स्थळी उतरतील. ही मोहीम पुढील वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीमध्ये राबविण्याचे उद्दिष्ट ठेवून ‘इस्रो’कडून काम करण्यात येत आहे. गगनयान मोहिमेच्या द़ृष्टिकोनातून एलएमव्ही-3 हे

प्रक्षेपणास्त्र उपयुक्त ठरेल, असा दावा ‘इस्रो’ने केला आहे. या प्रक्षेपणास्त्रावर गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेली एस 200 मोटर असल्याचे ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी म्हटले आहे. ‘एलव्हीएम’मध्ये नजीकच्या काळात अनेक सुधारणा करण्यात आल्या असून, ते मानवी मोहिमांसाठी उपयुक्त करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गगनयान मोहिमेच्या द़ृष्टीने ‘इस्रो’चे एकेक पाऊल पुढे पडत असल्यामुळे एकूण ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. खरे तर अशा मोहिमांसाठी सरकारचे मजबूत पाठबळ आवश्यक असते, त्याशिवाय त्या अपेक्षित गतीने पुढे जात नाहीत. त्या द़ृष्टिकोनातून विचार केला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमांकडे विशेष वैयक्तिक लक्ष दिले आहे. अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांच्या वेळी स्वतः उपस्थित राहून त्यांनी त्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

गगनयान मोहिमेची घोषणाच पंतप्रधान मोदी यांनी केली असल्यामुळे त्यासाठी आवश्यक पाठबळ देण्यात सरकार कुठेही कमी पडताना दिसत नाही. त्याचमुळे ‘इस्रो’चे एकेक पाऊल पुढे पडत आहे. देश वैज्ञानिक विकासाच्या पातळीवर नेहमीच प्रागतिक राहिला आहे, नव्या बदलांचे स्वागत करत आला आहे. या आव्हानात्मक क्षेत्रातील ही प्रगती केवळ वाखाणण्याजोगी नव्हे, तर अपरिमित शक्यतांना कवटाळणारी आहे, तो विश्वास आणि आशा या यशाने निर्माण केल्या आहेत. महासत्तेच्या दिशेने सुरू असलेल्या दमदार वाटचालीत हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.

Back to top button