Egyptian mummy : इजिप्तमध्ये 2 हजार मेंढ्यांच्या डोक्याची ममी | पुढारी

Egyptian mummy : इजिप्तमध्ये 2 हजार मेंढ्यांच्या डोक्याची ममी

कैरो : इजिप्तमध्ये प्राचीन काळात मानवी मृतदेहावर प्रक्रिया करून त्यांची ‘ममी’ बनवली जात असे, याची आपल्याला कल्पना आहेच. पण आता तिथे तब्बल दोन हजार मेंढ्यांच्या डोक्यांचीही ममी आढळून आल्या आहेत. फेरो (राजा) रामसेस द्वितीय याच्या इमारतीमध्ये प्रसादाच्या रूपात या मेंढ्या आणण्यात आल्या होत्या. इजिप्तमधील ‘टुरिझम अँड अँटिक्विटिज’ मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

दक्षिण इजिप्तमध्ये प्राचीन मंदिरे व मकबर्‍यांसाठी प्रसिद्ध असलेल्या एबिडोसमध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतील अमेरिकन पुरातत्त्व संशोधकांच्या एका टीमने याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांना कुत्रे, बकर्‍या, गुरे व मुंगसांच्याही ममी आढळून आल्या आहेत. अमेरिकन मिशनचे प्रमुख सामेह इस्कंदर यांनी सांगितले की, मेंढ्यांचे डोके म्हणजे वास्तवात ‘प्रसाद’ होता, जो रामसेस द्वितीय याला भेट म्हणून देण्यात आला होता. त्याच्या मृत्यूनंतर एक हजार वर्षांनी केल्या जाणार्‍या उपासना पद्धतीला हे दर्शवते. रामसेस द्वितीय याने इसवी सन पूर्व 1304 ते इसवी सन पूर्व 1237 या काळात राज्य केले होते.

इजिप्तच्या अँटिक्विटीजच्या सर्वोच्च परिषदेचे प्रमुख मुस्तफा वजिरी यांनी सांगितले की, या शोधामुळे रामसेस द्वितीय याच्या इमारतीबाबत अधिक जाणून घेण्यासही मदत होऊ शकते. टॉलेमिक काळापर्यंतच्या घडामोडीही जाणून घेतल्या जाऊ शकतात. या ममीकृत प्राण्यांच्या अवशेषांबरोबरच संशोधकांना सुमारे 4 हजार वर्षे जुन्या व पाच मीटर जाडीच्या भिंती असलेल्या महालाच्या अवशेषांचाही शोध लागला आहे. अनेक मुर्ती, प्राचीन वृक्षांचे अवशेष, कातडी पोशाख आणि पादत्राणेही याठिकाणी सापडले आहेत.

Back to top button