स्वीट कॉर्नच्या उत्पादनाकडे शेतकर्‍यांचा कल | पुढारी

स्वीट कॉर्नच्या उत्पादनाकडे शेतकर्‍यांचा कल

निमगाव दावडी : पुढारी वृत्तसेवा :  कांदा, कोबी, फ्लॉवर, बटाटा आदी पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने खेड तालुक्यातील शेतकरी आता कमी कालावधीत व कमी खर्चात अधिक उत्पन्न देणार्‍या स्वीट कॉर्न (मका) पिकाच्या उत्पादनाकडे वळू लागले आहेत. या पिकातून आर्थिक उत्पन्नासोबतच जनावरांसाठी चारा देखील मिळणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी स्वीट कॉर्नची पेरणीपूर्वीची मशागत सुरू केली, तर अनेकांनी स्वीट कॉर्नची पेरणी देखील केली आहे.

या वर्षी शेतीमालास योग्य भाव मिळाला नसल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळू लागला आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील स्वीट कॉर्नचा पर्याय बहुतांश शेतकर्‍यांनी निवडला आहे. स्वीट कॉर्न हे कमी कालावधीत निघणारे उत्तम पीक आहे. पिकांची फेरपालट करण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो. एकंदरीत, कमी कालवधीत व कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे हे पीक आहे.

स्वीट कॉर्नमधून 75 ते 90 दिवसांत एकरी 40 ते 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. स्वीट कॉर्नचे उत्पादन घेण्याचा दुहेरी फायदा आहे. आर्थिक उत्पन्न मिळतेच, त्यासोबत जनावरांसाठी मुबलक चाराही उपलब्ध होत आहे. या चार्‍यालाही मागणी आहे. यंदा चास-कमान कालव्याचे आवर्तन सुरू असल्याने पाण्याची कमतरता जाणवणार नाही. त्यामुळे हे मका पीक नक्की फायदेशीर ठरणार आहे. त्यानुसार शेतकर्‍यांनी पेरणीची कामे हाती घेतली आहेत.

 

Back to top button