सांगली : मणेराजुरीत टेंम्पोचा बर्निंग थरार | पुढारी

सांगली : मणेराजुरीत टेंम्पोचा बर्निंग थरार

तासगाव : पुढारी वृत्तसेवा : मणेराजूरी (ता. तासगाव) येथे रविवारी रात्री आयशर टेंम्पोला आग लागल्याची घटना घडली. यावेळी ग्रामस्थांना `बर्निंग ट्रक`चा थरार अनुभवायला मिळाला. प्रसंगावधानाने चालकाला बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत टेंम्पो द्राक्षाच्या क्रेट सहीत जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे आठरा ते वीस लाखाचे नुकसान झाले.

याबाबतची माहिती अशी की, मणेराजूरीतील भवानी रोडवर अनिल चव्हाण यांच्या घरात पश्चिम बंगाल येथील ‘झेंडू ‘ नामक द्राक्ष व्यापारी रहातो. त्याच्याकडून दररोज द्राक्ष गाडयांची आवक जावक होत असते. रविवारी रात्री दहाच्या दरम्यान पश्चिम बंगालला द्राक्षे पोहचवून आयशर टेम्पो येवून थांबला होता. रात्री अकराच्या दरम्यान या टेम्पोला अचानक आग लागली. टेम्पोत द्राक्षाचे मोकळे क्रेट होते. हौद्यात असणाऱ्या क्रेटला प्रारंभी आग लागली. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. केबिनमध्ये झोपलेल्या चालकाला हाका मारून जागे करण्याचा प्रयत्न केला परंतु झोपेत असणाऱ्या चालकाला कोणाचीच हाक ऐकू आली नाही. शेवटी प्रसंगावधान राखून किरण जमदाडे, संजय पाटील, राहूल जमदाडे, सतीश जमदाडे, किशोर जमदाडे व दलालाकडील युवकांनी समोरील काच फोडून चालकाला बाहेर काढले. जमावाने पाणी मारून आग आटोक्यात आणली. आगीमध्ये ज्या लिंबाच्या झाडाखाली हा टेम्पो होता ते झाडही जळाले.

तासगाव नगरपालिकेच्या अग्निशमनच्या दूरध्वनी क्रमांकावर अनेक वेळा फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पोलीस पाटील दिपक तेली यांनी तासगाव पोलीसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाशी संपर्क करून बोलावले. घटनास्थळी हवालदार बजरंग थोरात यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.

हेही वाचा : 

Back to top button