राहुरी : वाटणीवरून भावावर कोयत्याने वार | पुढारी

राहुरी : वाटणीवरून भावावर कोयत्याने वार

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : शेतीसह घराच्या वाटणीवरून लहान भावाने मोठ्या भावावर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील गणेगाव येथे घडली. दरम्यान, जखमी भावावर श्रीरामपूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशांत गुलाब कोबरणे (वय 30 वर्षे, रा. गणेगाव, ता. राहुरी) या तरूणाची आई व लहान भाऊ प्रमोद दहा वर्षांपासून श्रीरामपूर येथे राहतात. प्रशांत कोबरणे व प्रमोद कोबरणे यांच्यात शेतीसह घराच्या वाटाघाटीच्या कारणातून नेहमी वाद होतात. प्रमोद कोबरणे सध्या होमगार्डमध्ये काम करतो.

तो प्रशांत कोबरणे याला नेहमी दमबाजी व मारहाण करतो. (दि.17 मार्च) रोजी संध्याकाळी 4.30 वाजेच्या सुमारास प्रशांत कोबरणे घरासमोर उभा असताना तेथे भाऊ प्रमोद कोबरणे आला. तो प्रशांत व वडिलांना शिविगाळ करीत म्हणाला, ‘तू मला माझी शेती व घराची वाटणी का देत नाही.’ यावर प्रशांत म्हणाला, ‘तू आम्हाला शिविगाळ करु नको. आपण गावातील चार प्रतिष्ठीत नागरीकांसमवेत बैठक घेवुन शेतीसह घराची वाटणी करू,’ या बोलण्याचा राग आल्याने प्रमोद याने घरासमोर पडलेला कोयता उचलून प्रशांत याच्यावर घरात घुसून वार केले.

प्रशांत रक्तभंबाळ होत जागेवर बेशुध्द पडला. त्याला दिलीप कोबरणे व ज्ञानेश्वर कोबरणे यांनी खासगी वाहनातून श्रीरामपूर येथे रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, प्रशांत कोबरणे याने शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांसमक्ष जबाब नोंदविला. त्यानुसार प्रमोद गुलाब कोबरणे (वय 25 वर्षे, रा. दत्तनगर, ता. श्रीरामपूर, हल्ली. रा. गणेगाव ता. राहुरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो. नि. मेघशाम डांगे करीत आहेत.

  • शेतीसह घराच्या वाटाघाटीच्या कारणातून नेहमी वाद होतात. प्रमोद कोबरणे भावाशी सतत वाद घालीत होता.

Back to top button