… अन् स्पेनमध्ये सापडले हजार वर्षांपूर्वीचे चर्च | पुढारी

... अन् स्पेनमध्ये सापडले हजार वर्षांपूर्वीचे चर्च

माद्रिद : स्पेनमध्ये गेल्या 36 महिन्यांपासून पावसाची तीव्रता कमी झाली असल्यामुळे तिथे काही प्रमाणात दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरविल्यामुळे नदी, तलाव यांसारख्या पाणवठ्यांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. तेथील सॅम रोमन डे साऊ नावाच्या गावातील जलाशयाचे पाणी वेगाने आटत आहे. 1990 नंतर पहिल्यांदा पाण्याने तळ गाठला असून, त्यामुळे जलाशयात बुडालेले चर्च आता बाहेर आले आहे. चर्च सुमारे एक हजार वर्षांपूर्वी बांधण्यात आले असावे, असा पुरातत्त्व शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

जलाशयात हे चर्च सापडले असल्यामुळे तिथे ते कोणी बांधले असेल यावर आता नव्याने संशोधन केले जात आहे. हे गाव स्पेनमधील कॅटालोनिया प्रांतात आहे. इथे गेल्या चार दशकांतील सर्वात भयानक दुष्काळ पडला आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती अजून बिघडू शकते, असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. बार्सिलोना आणि माद्रिदच्या आसपासचे भागही दुष्काळाचे बळी ठरले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी तलावांचे तळ दिसू लागले आहेत. स्पेनच्या हवामान विभागाने एईएमईटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुष्काळ पडल्यामुळे जंगलात आग लागण्याचे प्रमाण वाढू शकते.

उष्णतेच्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण, उत्तर-पूर्वी भूमध्य सागरच्या जवळपास असलेल्या परिसरात उष्णता वाढत चालली आहे. ज्यामुळे कॅटालोनिया, बार्सिलोना आणि माद्रिद या शहरांवरही परिणाम होत आहे. साऊ जलाशयात फक्त 10 टक्के पाणी उरले आहे. त्यामुळे लोक आता जलाशयातून वेगाने मासे काढत आहेत कारण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे माशांचा मृत्यू होऊ शकतो. यास्तव माशांना बाहेर काढणे योग्य आहे, असे तिथले नागरिक म्हणत आहेत.

Back to top button