National party status of NCP | राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात; पक्षाने निवडणूक आयोगात मांडली बाजू | पुढारी

National party status of NCP | राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात; पक्षाने निवडणूक आयोगात मांडली बाजू

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेससह काही अन्य पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा (National party status of NCP) दर्जा धोक्यात आला असून यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादीतर्फे या मुद्यावर प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगासमोर बाजू मांडली आहे.

देशात सध्या राष्ट्रवादीसह आठ पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त आहे. यापैकी राष्ट्रवादी, भाकप आणि बसपा या तीन पक्षांचा हा दर्जा धोक्यात आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने पक्षांच्या दर्जाबाबत फेरआढावा घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, दरम्यानच्या काळात संबंधित पक्षांनी केलेली विनंती, विधानसभा निवडणुका, कोरोनाचे संकट आणि इतर कारणांमुळे सदर प्रक्रिया लांबणीवर पडली होती.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवायचा की नाही, या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी तसेच भाकपचे मत जाणून घेतले आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या वकिलांसह आयोगासमोर बाजू मांडली. दरम्यान, तृणमूल काँग्रेसनेही आपले म्हणणे मांडले असल्याचे समजते. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षासोबतच प्रादेशिक पक्षांचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार आतापर्यंत सहा प्रादेशिक पक्षांची भूमिका जाणून घेण्यात आली आहे.

‘या’ अटींची पूर्तता आवश्यक

कोणत्याही पक्षाला त्याचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकांमध्ये कमीतकमी चार राज्यांमध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त मते प्राप्त होणे, शिवाय तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या कमीत कमी दोन टक्के जागांवर म्हणजे ११ जागांवर विजय प्राप्त करणे आवश्यक असते. राष्ट्रवादीसह (National party status of NCP) अन्य पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवायचा की नाही, याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे.

 हे ही वाचा :

Back to top button