सुखोई विमानामुळे धावपट्टी बंद; पुणे विमानतळावर उड्डाणांना उशीर | पुढारी

सुखोई विमानामुळे धावपट्टी बंद; पुणे विमानतळावर उड्डाणांना उशीर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय हवाई दलाच्या सुखोई विमानाला सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तांत्रिक अडचण निर्माण झाली, त्यामुळे काही वेळासाठी पुणे विमानतळाची धावपट्टी बंद करण्यात आली. यामुळे नागरी विमान वाहतुकीवर परिणाम झाला. काही विमानांची उड्डाणे उशिरा झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

पुणे विमानतळावर सकाळच्या सुमारास सकाळी 9 ते साडेअकराच्या सुमारास हवाई दलाचे जवान सराव करतात. असाच सराव सोमवारी सुरू होता. या सरावादरम्यान एस यू-30 एमकेआय या विमानाचे अ‍ॅरेस्टर बॅरिअर अडकले, त्यामुळे विमान उतरवताना वैमानिकाला मोठी कसरत करावी लागली. त्या वेळी पुणे विमानतळावरून होणारी नागरी विमान सेवा अर्धा ते पाऊण तास बंद होती, ती काही वेळाने पुन्हा सुरू झाली. मात्र, दरम्यानच्या काळात प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

विमानाचे कोणतेही नुकसान नाही
भारतीय वायुसेनेचे एक एअरक्राफ्टचे अरेस्टर बॅरिअरमध्ये अडकले, त्यामुळे तांत्रिक बिघाड झाला. विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. काही वेळासाठी पुणे विमानतळावरील धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली होती. धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

                              -आशिष मोघे, जनसंपर्क अधिकारी, हवाई दल

आता विमानउड्डाणे सुरळीत
सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. एअर ट्रॅफिक कंट्रोल ऑपरेशन एअरफोर्सकडे असते. त्यामुळे या वेळी नक्की काय घडले, याबाबत आम्हाला सांगता येणार नाही. मात्र, सकाळच्या सुमारास विमानउड्डाणांवर काही काळ परिणाम झाला होता. आता विमानउड्डाणे सुरळीत सुरू आहेत.

                                           – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

पुण्यासाठी स्वतंत्र नागरी विमानतळ हवे…
पुण्यासारखे गतिमान, व्यस्त व भारतातील महत्त्वाचे औद्योगिक व आर्थिक केंद्र असलेल्या शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक, अपुर्‍या पायाभूत सुविधांमुळे काही काळासाठी, अशा प्रसंगी बंद करावी लागते, हे शहरासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रसंगी केवळ पुण्यातील प्रवाशांचेच नाही तर उशीर झालेल्या विमानामुळे दिवसभरात ते नंतर जिथे-जिथे फ्लाईट ऑपरेट करणार असते तेथील प्रवाशांची पण झालेल्या विलंबामुळे मोठी गैरसोय होत असते. एअरलाइन्स इत्यादींचे आर्थिक नुकसान होते ते वेगळेच. या प्रसंगामुळे पुण्यासाठी स्वतंत्र नागरी विमानतळ असण्याची तातडीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सरकारने लवकरात लवकर पुण्यासाठी कमीत-कमी दोन धावपट्ट्या असलेले आधुनिक नागरी विमानतळ उभारण्यास पुढाकार घ्यावा

. – धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

Back to top button