Suryakumar vs Gavaskar : सूर्या वनडेत फ्लॉप होण्यामागे ‘हे’ आहे कारण! गावसकर म्हणाले… | पुढारी

Suryakumar vs Gavaskar : सूर्या वनडेत फ्लॉप होण्यामागे ‘हे’ आहे कारण! गावसकर म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar vs Gavaskar : सुर्यकुमार यादव त्याच्या स्टान्समुळे वनडेत अपयशी ठरत आहे, असे स्पष्ट मत भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर सुनिल गावसकर यांनी मांडले. एका क्रिडा वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी सूर्याचे कान टोचले. तसेच सूर्याने फलंदाजी प्रशिक्षकासोबत चर्चा करून या समस्येवर तोडगा काढावा, असा महत्त्वाचा सल्लाही दिला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार ‘गोल्डन डक’चा बळी ठरला. दोन्ही सामन्यात एलबीडब्ल्यू आऊट होऊन तो पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्याच्या अशाप्रकारे बाद झाल्यानंतर चाहते खूपच निराश झाले. क्रिकेट तज्ञांनीही त्याच्यावर टीकास्त्र सोडले. या खराब प्रदर्शनानंतर सूर्याला तिस-या वनडेतून डच्चू मिळेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत गावसकर म्हणाले की, एकदिवसीय सामन्यांमध्ये सूर्या ज्या पद्धतीने स्टान्स घेतो ते खटकते. त्याच्या बाद होण्यामागे एक मुख्य कारण आहे. सर्या जेव्हा स्टान्स घेतो तेव्हा त्याच्या मागील स्टंप्स गोलंदाजाला स्पष्टपणे दिसतात. टी-20 साठी असा स्टान्स उपयुक्त ठरतो, पण क्रिकेटच्या मोठ्या फॉरमॅटममध्ये अशा स्टान्समुळे अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सूर्याने फलंदाजी प्रशिक्षकासह चर्चा करून या समस्येवर तोडगा काढणे आवश्यक आहे, असे सांगितले. (Suryakumar vs Gavaskar)

टी-20 मध्ये सूर्याने गेल्या दीड वर्षात खूप धमाल केली आहे, पण त्याला अजूनही एकदिवसीय क्रिकेटचा फॉर्म्युला सापडलेला नाही. या फॉरमॅटमध्ये त्याने 22 एकदिवसीय सामन्यांमध्ये 25.47 च्या सरासरीने 422 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर फक्त दोन अर्धशतके आहेत. हे आकडे त्याच्या क्षमतेला साजेसे नाहीत. (Suryakumar vs Gavaskar)

रोहितकडून सुर्यकुमारची पाठराखण

दुसऱ्या वनडेतील पराभवानंतर रोहितने सूर्याचा बचाव केला आहे. सूर्या नक्कीच खराब फॉर्ममधून जात आहे पण त्याला संधी मिळत राहतील असे रोहितने स्पष्ट केले आहे. सूर्याविषयी रोहित म्हणाला, ‘श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाबद्दल आम्हाला माहिती नाही. जर त्याची जागा रिकामी असेल तर आपण फक्त सूर्याचाच विचार करू शकतो. त्याने टी-20 मध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि मी अनेकदा सांगितले आहे की सूर्याकडे क्षमता आहे. त्यामुळे त्याला संधी मिळेल,’ असे सांगितले.

सूर्यकुमारने 18 जुलै 2021 रोजी कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यात त्याने नाबाद 31 धावा करून खूप प्रभावित केले होते. त्यानंतर दुसऱ्या वनडेतही सूर्याने अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर असे वाटले की सूर्या मधल्या फळीत एक मजबूत खेळाडू म्हणून उदयास येईल, परंतु 9 फेब्रुवारी 2022 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध 64 धावांची इनिंग खेळल्यानंतर त्याने आपला वेग गमावला आहे. सूर्या गेल्या 14 वनडे डावांत अर्धशतक फटकावू शकलेला नाही.

सूर्या का फ्लॉप होतोय?

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये बहुतांश खेळाडूंना यश मिळू शकत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट बचाव तंत्र आवश्यक असते, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाज प्रथम आपला डाव सांभाळून खेळतो आणि नंतर मोठे फटके खेळतो. तर टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजाला स्थिरावण्यास वेळ मिळत नाही. सूर्यकुमार यादवने त्याच्या 360 डिग्री कौशल्यामुळे टी-20 क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत, परंतु सध्या तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये फिट होऊ शकत नाही. अधिक टी-20 सामने खेळल्यामुळे त्याचा एकदिवसीय फॉर्मवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमारचा फलंदाजीचा क्रमही निश्चित नाही. उजव्या हाताच्या फलंदाजाने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत 20 डाव खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने तीन वेळा क्रमांक-3 वर एकदा, क्रमांक-4 वर 5 वेळा, पाचव्या क्रमांकावर 11 वेळा आणि सहाव्या क्रमांकावर 3 वेळा फलंदाजी केली आहे. कदाचित सूर्याला कोणत्याही एका क्रमांवर खेळण्याची संधी मिळाली तर कदाचित त्याचा फॉर्म परत येईल, अशी शक्यता काही तज्ञंनी व्यक्त केली आहे.

Back to top button