NZ vs SL 2nd Test : न्यूझीलंडने श्रीलंकेचा उडवला धुव्वा! किवींनी 2-0 ने जिंकली मालिका | पुढारी

NZ vs SL 2nd Test : न्यूझीलंडने श्रीलंकेचा उडवला धुव्वा! किवींनी 2-0 ने जिंकली मालिका

पुढारी ऑनलाईन डेस्क : NZ vs SL 2nd Test : वेलिंग्टन येथे दुस-या कसोटीत यजमान न्यूझीलंडने श्रीलंकेचा एक डाव आणि 58 धावांनी पराभव करून धुव्वा उडवून दिला. यासह किवी संघाने पाहुण्या संघाला क्लिन स्विप देत दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली आहे. फॉलोऑन खेळताना श्रीलंकेचा संघ चौथ्या दिवशी 142 षटकांमध्ये 358 धावांत गारद झाला. याचबरोबर न्यूझीलंडने दणदणीत विजय मिळवला.

श्रीलंकेला चौथ्या दिवशी पहिल्याच षटकात झटका

तत्पूर्वी, तिसऱ्या दिवसाच्या 2 बाद 113 धावसंख्येपुढे खेळताना श्रीलंकेला सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिल्याच षटकात (44) मोठा झटका बसला. मॅट हेन्रीने कुसल मेंडिसला (50) बाद केले. त्यानंतर 46.1 व्या षटकात अँजेलो मॅथ्यूजही (32) माघारी परताला. टिकनरने त्याचा अडसर दूर केला. यावेळी श्रीलंकेची धावसंख्या 4 बाद 116 अशी होती. येथून पुढे दिनेश चंडिमल आणि धनंजय डी सिल्वा यांनी किवी गोलंदाजांच्या आक्रमणाचा संयमी खेळी करत बचाव केला. दोन्ही फलंदाजांनी आपली अर्धशतके पूर्ण केली आणि शतकी भागीदारी करून धावसंख्या 200 च्या पुढे नेली. उपाहारापूर्वी टीकनरने चंडीमलला (62) बाद करून किवी संघाला पाचवे यश मिळवून दिले. उपाहारापर्यंत श्रीलंकेने 78 षटकांत 5 बाद 249 धावा केल्या होत्या. धनंजय 63 आणि निशान मदुष्का 6 धावांवर नाबाद खेळत होते. (NZ vs SL 2nd Test)

उपाहारानंतर दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आणि संघाने 300 धावा पूर्ण केल्या. मात्र, ही जोडी टीकनरे फोडली. त्याने मदुष्काला (39) बाद केले. चहापानापर्यंत श्रीलंकेची 105.4 षटकांत 6 बाद 318 धावा अशी स्थिती होती. चहापानानंतर धनंजय (98) तंबूत परतला. त्याचे शतक केवळ दोन धावांनी हुकले. मायकल ब्रेसवेलने त्याची विकेट घेतली.

यानंतर खालच्या फळीतील फलंदाजांनी टिकून राहण्याचा प्रयत्न केला पण एकापाठोपाठ ते क्रिजवर हजेरी लावून पॅव्हेलियनमध्ये परतले. कसून रजिताने 110 चेंडूत 20 धावा केल्या. त्याची विकेट घेऊन साऊदीने त्याची शिकार करून श्रीलंकेचा डाव संपुष्टात आणला आणि सामन्यासह मालिका खिशात टाकली. किवी कर्णधार टीम साऊदी आणि ब्लेअर टिकनरने प्रत्येकी तीन बळी घेतले. मायकल ब्रेसवेलने 2 तर, मॅट हेन्री आणि डग ब्रेसवेलला 1-1 विकेट मिळाली. (NZ vs SL 2nd Test)

न्यूझीलंडने असा जिंकला सामना

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 4 गडी बाद 580 धावांवर पहिला डाव घोषित केला. केन विल्यमसन (215) आणि हेन्री निकोल्स (200) यांनी संघाकडून द्विशतके झळकावली. मोठ्या धावसंख्येच्या दबावाखाली खेळताना श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 164 धावांत गारद झाला. यानंतर त्यांना यजमान संघाने फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात श्रीलंकेने काहीशी झुंज दिली आणि 358 धावांपर्यंत मजल मारली. पण ते आपला पराभव टाळू शकले नाहीत.

किवींच्या भूमीवर 7 वी कसोटी मालिका गमावली

न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी सामन्यांमध्ये श्रीलंकेचे रेकॉर्ड खराब आहे. यजमान संघाविरुद्ध घरच्या मैदानावर लंकन संघाचा हा 7 वा मालिका पराभव आहे. दोन्ही देशांमध्ये पहिली कसोटी मालिका 1982-83 मध्ये न्यूझीलंडमध्ये खेळली गेली, ज्यामध्ये यजमानांनी 2-0 असा क्लीन स्वीप केला होता. यानंतर 1996-97 साली (2-0), 2004-05 साली (1-0), 2014-15 साली (2-0), 2015-16 साली (1-0) आणि 2018-19 (1-0) श्रीलंकेचा (1-0) न्यूझीलंडमध्ये पराभव झाला.

धनंजयच्या कसोटीत 3 हजार धावा पूर्ण

या सामन्यात धनंजय डिसिल्वाचे शतक हुकले. पण चौथ्या दिवशी त्याने मोठी कामगिरी करत कसोटी क्रिकेटमध्ये तीन हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो 15वा लंकन फलंदाज ठरला. त्याने 47व्या कसोटीच्या 85व्या डावात हा टप्पा गाठला. माजी कर्णधार कुमार संगकारा (12,400), महेला जयवर्धने (12,400) आणि अँजेलो मॅथ्यूज (7,118) हे श्रीलंकेसाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू आहेत.

विल्यमसन-निकोल्सचा विक्रम

विल्यमसन आणि निकोल्स यांनी शानदार द्विशतकी खेळी करून वेलिंग्टन कसोटी संस्मरणीय बनवली. कसोटी डावात एकत्र द्विशतक झळकावणारी ही न्यूझीलंडची पहिली जोडी ठरली. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी आतापर्यंत एकूण 18 वेळा घडली आहे. माजी कर्णधार विल्यमसन आणि निकोल्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी 467 चेंडूत 363 धावांची मॅरेथॉन भागीदारी केली.

विल्यमसनच्या 8,000 धावा पूर्ण

विल्यमसनने वेलिंग्टन कसोटीत 8,000 धावा पूर्ण केल्या. हा आकडा गाठणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला. 251 च्या सर्वोच्च धावसंख्येसह विल्यमसनच्या नावावर कसोटीत 6 द्विशतके, 28 शतके आणि 33 अर्धशतके आहेत. रॉस टेलर (7,683), स्टीफन फ्लेमिंग (7,172) आणि ब्रेंडन मॅक्युलम (6,453) हे विल्यमसननंतर न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू आहेत.

32 वर्षीय विल्यमसन दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 3 डावात 168.50 च्या फलंदाजीची सरासरी आणि 67.27 च्या स्ट्राईक रेटने एकूण 337 धावा वसूल केल्या. त्याचा सहकारी निकोल्स दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने 3 डावात 111.00 च्या सरासरीने 222 धावा केल्या. गोलंदाजीत, टिम साऊदी (11) आणि मॅट हेन्री (11) हे संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज ठरले.

Back to top button