पुणे : वैविध्यपूर्ण गाठी अन् गुढ्यांनी सजली बाजारपेठ | पुढारी

पुणे : वैविध्यपूर्ण गाठी अन् गुढ्यांनी सजली बाजारपेठ

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  लाल, पिवळा, नारंगी अन् पांढर्‍या रंगांच्या साखरेच्या गाठींच्या खरेदीसाठी झालेली गर्दी… ड्रायफ्रुट असलेल्या साखर गाठी अन् विविध डिझाइनमधील गाठींनी सजलेली दुकाने… गुढीपाडव्याच्या आनंदी सणाला अवघे काही दिवस उरल्याने साखरेच्या गाठींच्या खरेदीसाठी रविवार पेठ, मंडईसह इतर बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. वैविध्यपूर्ण रंगांतील गाठींसह ड्रायफ्रुट असलेल्या साखर गाठी अन् विविध प्रकारांतील गाठींना मागणी आहे. शनिवारी (दि. 18) गाठींच्या खरेदीसाठी लगबग पाहायला मिळाली.

गुढीपाडव्याचा सण बुधवारी (दि. 22) आनंदात साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरासमोर गुढ्यांना बांधल्या जाणार्‍या साखरेच्या गाठीला मागणी असते. विविध रंगांतील गाठी सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लाल, गुलाबी, पिवळा, नारंगी, गुलाबी रंग लक्ष वेधून घेत आहे. एक गाठ 20 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत मिळत आहे.

सध्या साखरेच्या गाठी बनविण्याच्या कारखान्यात लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळेच सणाचा गोडवा वाढविण्यासाठी गाठींच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. कारखान्यांमध्ये तयार करून या गाठी होलसेल भावात दुकानांमधून विकल्या जात आहेत.
व्यावसायिक अमर अगरवाल म्हणाले, आम्ही महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवसापासून कारखान्यात साखर गाठी बनविण्यास सुरुवात केली. रोज 500 किलोच्या साखर गाठी तयार करून त्याची होलसेल भावात विक्री करीत आहोत. छोट्या आकारातील गाठींची किंमत 20 रुपयांपासून आहे, तर मोठ्या आकारातील गाठी 100 रुपयांपासून पुढे आहे. गाठींच्या किमतीही वाढलेल्या नाहीत.

पूजेसाठी अन् लहान आकारातील तयार गुढ्या, पूजेसाठी लागणार्‍या साहित्यांचा बॉक्स अन् गुढी उभारणीसाठी लागणारे विविध रंगांतील वस्त्र, अशा विविध प्रकाराच्या साहित्यांची गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. यंदा लहान आकारातील तयार गुढ्यांना सर्वाधिक मागणी असून, आप्तेष्टांना भेट देण्यासाठी तयार गुढ्यांची खरेदी होत आहे. मोठ्या आकारातील तयार गुढ्याही बाजारात उपलब्ध आहेत. त्याचीही खरेदी होत असून, अगरबत्तीपासून ते हळदी-कुंकू, असे गुढी पूजेसाठी लागणार्‍या साहित्याच्या बॉक्सलाही पसंती आहे.

शनिवारी (दि. 18) सणानिमित्त लागणार्‍या साहित्यांच्या खरेदीसाठी रविवार पेठ, मंडई, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग येथे लगबग दिसून आली. खास करून लहान आकारातील तयार गुढ्यांच्या खरेदीवर अनेकांनी भर दिला. गुढ्यांची किंमत 100 ते 200 रुपयांपर्यंत आहे. तर, मोठ्या आकारातील तयार गुढ्यांचीही खरेदी झाली. रूपाली शहा म्हणाल्या, की पूजेसाठी, भेट देण्यासाठी लहान आकारातील तयार गुढ्यांची खरेदी होत आहे. आम्ही या गुढी तयार करतो. गुढीपाडव्यानिमित्त जवळपास 400 ते 500 गुढ्यांची विक्री होते. या गुढ्या तयार करण्यासाठी एक महिना लागतो. यंदा गुढ्यांच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु, त्याला मागणी जास्त आहे.

कारखान्यांमधून गाठी आणून होलसेल भावात आम्ही विकतो. गुलाबी, पिवळा अशा विविध रंगांमधील गाठींना मागणी असून, लहान मुलांसाठी अन् गुढी उभारणीसाठी गाठी विकत घेतल्या जात आहेत.
                                                                 – मनीष काची, व्यावसायिक

 

Back to top button