सांगली :लोकप्रतिनिधी या नात्याने नागरिक म्हणून पूर्ण पाठिंबा : वैभव पाटील | पुढारी

सांगली :लोकप्रतिनिधी या नात्याने नागरिक म्हणून पूर्ण पाठिंबा : वैभव पाटील

विटा (सांगली) : पुढारी वृत्तसेवा – पक्षाची काहीही भूमिका असेल, सरकारची काहीही भूमिका असेल. पण मी एक लोक प्रतिनिधी या नात्याने एक नागरिक म्हणून आपल्याला पूर्ण पाठिंबा देतो, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे युवा नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आपल्या भावना आंदोलकांसमोर मांडल्या.

विट्यात आज शुक्रवारी सर्व कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. येथील पंचायत समिती आवारातून मोर्चाला सुरूवात झाली. त्यानंतर मुख्य शिवाजी चौकातून पुढे मोर्चा प्रशासकीय इमारतीवर धडकला.

यावेळी हालगी, घुमक्याच्या निनादात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. राष्ट्रवादीचे युवा नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठींबा देत राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली. यावेळी तहसिलदार उदयसिंह गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

वैभव पाटील म्हणाले, अनेक योजना सरकारच्या फायद्याच्या आहेत, की तोट्याच्या हे न पाहता तुम्ही राबवत असता. मग कर्मचाऱ्यांचे कल्याण करणारी योजना आपण का लागू करीत नाही? एखाद्या लोक प्रतिनिधीने प्रश्न मांडला की त्याचे आर्थिक फायदे-तोटे न पाहता तुम्ही कोट्यवधींची तरतूद करता. मग या लोकांनी तुमचे काय वाईट केले, की त्यांना टोकाची भूमिका घेण्यासाठी तुम्ही भाग पाडता? या संपामुळे सर्वसामान्य लोकांचे मोठे हाल होत आहेत. अनेक मोठे निर्णय तुम्ही एका रात्रीत घेता. मग हा निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागतोय?

आज चौथा दिवस आहे. आता यावर निर्णय झाला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही योजना लागू करणार आहोत, मात्र आता तुम्ही सरकारमध्ये आहात. आता तुमचे थोडेच दिवस शिल्लक आहेत, या काळात तरी तुम्ही चांगला निर्णय घ्यावा, असा टोलाही पाटील यांनी लगावला. अध्यक्ष मुरलीधर दोडके म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या एकजूटीमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न शासनाने करू नये. आम्ही पिढ्या घडवण्याचे काम करतो. त्या पिढीच्या संवर्धनासाठी पेन्शन हा आमचा हक्क आहे. आमचा मुलभूत अधिकार हिरावून घेऊ नये, अशी मागणी दोडके यांनी केली. यावेळी किशोर राजवळ, संतोष जगताप, विकास शिंदे, शकिल तांबोळी, प्रताप टकले, किशोर कांबळे, दौलतराव बोडरे, दिलीप सानप, संदिप साळवे, आर. व्ही. शेडगे, संजय सागर यांच्यासह अनेक महिला कर्मचारीही उपस्थित होते.

Back to top button