पाथर्डी : सर्व घटकांसाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प : आमदार मोनिका राजळे | पुढारी

पाथर्डी : सर्व घटकांसाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प : आमदार मोनिका राजळे

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : शेतकरी-कष्टकर्‍यांपासून ते समाजाच्या अंतिम घटकापर्यंत सर्वार्थाने पोहोचलेला ‘क्रांतिकारी’ असा हा अर्थसंकल्प आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा सामान्य माणसाला समृद्ध करणारा ‘पंचसूत्री अर्थसंकल्प’ आहे अशी प्रतिक्रिया आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासू नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा पंचामृत अर्थसंकल्प काल जाहीर झाला.

‘शाश्वत शेती, समृद्ध शेती’ हे पहिलेच सूत्र या अर्थसंकल्पात असल्याने शेतकर्‍यांसाठी अनेक क्रांतिकारी घोषणा यावेळी केल्या गेल्या. यापूर्वी शेतकर्‍यांना ‘किसान सन्मान’ योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्षी 6 हजार रूपये मिळण्याची तरतूद होती. महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांच्या कष्टांना ताकद देत त्यात आणखी 6 हजार रुपयांची भर घालत महत्त्वपूर्ण अशा ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ची घोषणा केली. आता या शेतकर्‍यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपये मिळतील.

महिला बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वयंरोजगाराच्या योजना, महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट योजना, मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ सारखी अभिनव योजना यातून महिलांना नवी शक्ती देण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. मराठा समाजासह अठरा पगड जातींच्या आर्थिक उत्थानासाठी त्या त्या समाजाच्या संस्थांना राज्य सरकारने घोषित केलेला भरीव निधी राज्यातील ‘अंत्योदया’चे महत्त्वाचे पाऊल आहे. सर्वच समाजातील नागरिकांसाठी आर्थिक स्वातंत्र्य घोषित करणारी बाब आहे.

आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांना मानधनात भरीव वाढ केली. अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या 20 हजार नवीन पदभरतीची घोषणा करत महिलांसाठीच्या नवीन रोजगार संधीची उपलब्धता यात करण्यात आली आहे. ‘वारकरी मानधन योजना’ लागू करत सरकारने आयुष्यभर पांडुरंगाची सेवा करत समाजप्रबोधन करणार्‍या वारकरी बांधवांना मोठी भेट दिली आहे.

महानुभाव पंथियांचे पवित्र तीर्थक्षेत्र मानल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र ऋद्धपूर मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा या निमित्ताने करण्यात आली. महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असणार्‍या या दोन पंथांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचे दिसून आले. ‘महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळा’ची स्थापना करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

अशा शाश्वत विचारांच्या आणि दूरदृष्टीपूर्वक बनविण्यात आलेल्या राज्याच्या पंचामृत अर्थसंकल्पाचे आणि त्यात मातृत्व ओतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छाशक्तीचे मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राला 1 ट्रिलीयन इकॉनॉमी बनविण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नाला यामुळे नवे पंख फुटले आहेत. राज्य सरकार व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अथक परिश्रम आणि अभ्यासू नेतृत्वामुळे येत्या काळात महाराष्ट्राचा हा अर्थसंकल्प ‘सुवर्ण संकल्प’ म्हणून ओळखला जाईल, याची मला खात्री आहे, असे आमदार राजळे यांनी सांगितले.

 

Back to top button