जुन्नर तालुका पर्यटन विकासाला मोठी चालना | पुढारी

जुन्नर तालुका पर्यटन विकासाला मोठी चालना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यंदाचे वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे 350 वे वर्ष असल्याने शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी तब्बल 350 कोटी रुपये व गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय व किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपये असा एकूण तब्बल 650 कोटींच्या भरघोस निधीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली. यामुळे शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

शिवजन्मभूमीच्या व महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल, अशी घोषणा नुकत्याच झालेल्या शिवजयंती उत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीवर झालेल्या कार्यक्रमात केली होती. त्यानुसार गुरुवारी झालेल्या अर्थसंकल्पात 650 कोटींच्या भरघोस निधीची तरतूद करण्यात आल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवरील शिवकालीन वस्तुसंग्रहालयाचे काम करावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी यानिमित्त मार्गी लागली आहे. शिवजन्मभूमी सातवाहनांची पहिली राजधानी असलेल्या नाणेघाट तसेच जुन्नर शहराचा इतिहास, शिवकालीन वस्तू यांची माहिती पर्यटकांसह अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी शिवनेरीवरील अंबरखाना इमारतीत शिवकालीन वस्तुसंग्रहालय आणि माहिती केंद्र स्थापन करण्याची मागणी सह्याद्री गिरीभ—मण संस्थेने केली होती. ती आत पूर्णत्वास जाणार आहे.

शिवकालीन दुर्गबांधणीचे मॉडेल फोर्ट म्हणून किल्ले शिवनेरीचे संवर्धन करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे शिवनेरीला भेट देणार्‍या दुर्गप्रेमी पर्यटक आणि शिवप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जुन्नर तालुक्याला इ.स. पूर्वचा इतिहास असून, त्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. यामुळे शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांना आकर्षण वाटेल, असे प्राचीन वस्तू आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचे संग्रहालय उभारण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असल्याने किल्ले शिवनेरी आणि शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याला वेगळे महत्त्व आहे. यामुळेच किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास पुढच्या पिढीला समजावा म्हणून किल्ले शिवनेरीवर शिवकालीन वस्तुसंग्रहालय उभारण्यात यावे अशी अनेक वर्षांपासून माझी मागणी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवनेरी महोत्सव आणि शिवकालीन वस्तुसंग्रहालयासाठी तब्बल 650 कोटींची भरघोस तरतूददेखील केली. मी मतदारसंघातील सर्व मतदार व तमाम शिवप्रेमींच्या वतीने दोघांचे आभार मानतो.

                  शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार, शिरूर

किल्ले शिवनेरीवर वस्तुसंग्रहालय व्हावे, यासाठी सन 2002 पासून आम्ही पाठपुरावा करीत होतो. त्यास मूर्तस्वरूप प्राप्त होण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने मंजुरी दिली. यामुळे शिवप्रेमींचा विजय झाला आहे. जगभरातून येणारे पर्यटक, अभ्यासक यांना संग्रहालयाच्या माध्यमातून मोठी उपलब्धी होणार असून, शिवप्रेमींना गडावर भेट देताना महाराजांच्या आठवणी सोबत घेऊन जाता येतील.

                                संजय खत्री, अध्यक्ष, सह्याद्री गिरीभ्रमण संस्था, जुन्नर.

Back to top button