पुणे : दोन दिवस यलो अलर्ट; जिल्ह्यात अवकाळीचा धुमाकूळ, पिकांचे मोठे नुकसान | पुढारी

पुणे : दोन दिवस यलो अलर्ट; जिल्ह्यात अवकाळीचा धुमाकूळ, पिकांचे मोठे नुकसान

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून तापलेल्या शहरावर काळ्याभोर ढगांनी गर्दी केल्याने पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे कमाल तापमानात 5 ते 6 अंशांनी घट झाली. उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले. 24 तासांत शहरात 1 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, आगामी दोन दिवस शहराला यलो अलर्ट देण्यात आला असून, 9 मार्चपर्यंत वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज आहे.

हिमालयात तयार झालेल्या चक्रवातामुळे उत्तर भारताकडून शहराकडे गार वारे वेगाने दाखल झाले. काळ्याभोर ढगांनी आकाश झाकोळून गेल्याने सोमवारी होळीच्या दिवशी रात्री 7 च्या सुमारास हलका पाऊस शहरातील सर्वच भागांत झाला. त्यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास पुन्हा आभाळ काळ्याभोर ढगांनी भरून आले आणि 4.30 वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे पंधरा मिनिटांत पावसाने रस्ते चिंब भिजले. वातावरणात गारवा निर्माण झाला. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी शहरात 1 मिमी पावसाची नोंद झाली.

बारामती तालुका गारठला
बारामती तालुक्यात सोमवारी (दि. 6) रात्रीसह मंगळवारी (दि. 7) काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवारी रात्री सोसाट्याच्या वार्‍यासह तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस झाला. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारासही पावसाने हजेरी लावली. ढगाळ हवामान व अवकाळीचा सर्वाधिक फटका गहू, हरभर्‍यासह कांद्याला बसला. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. हवामान खात्याने अवकाळीचा अंदाज वर्तवल्यानंतरच शेतकर्‍यांच्या पोटात गोळा आला होता.

सोमवारी दुपारपर्यंत कडक ऊन होते. दुपारनंतर वातावरण अचानक बदलले. सायंकाळी होळी सणाचा उत्साह सुरू असतानाच अचानक सोसाट्याचा वारा सुटला. आकाशात ढग भरून आले. ढगांचा गडगडाट सुरू झाला. काही वेळांतच पावसाने सुरुवात केली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे फार वेळ पाऊस पडला नाही. परंतु तरीही शेतकरी कमालीचा भयभीत झाला.

अंथुर्णे परिसरात पिकांचे नुकसान
अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे मंगळवार (दि. 7) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे शेतात काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाचे नुकसान होणार असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. सोमवारी रात्री या परिसरात वादळी वार्‍यासह विजांचा कडकडाट सुरू होता. सध्या या परिसरात बर्‍याच शेतकर्‍यांचा गहू काढणीला आला आहे. वास्तविक हवामान खात्याने गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती.

तेव्हापासून या भागातील शेतकरी गहू कापणीसाठी धडपडत होते. मात्र, मजुरांची टंचाई असल्याने मशिनद्वारे गहू करावा लागत असून, या मशीनचीही कमतरता आहे. परिणामी, शेकडो शेतकर्‍यांचा काढणीला आलेला गहू शेतात तसाच उभा आहे. अशातच मंगळवारी दुपारी आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला आणि हलक्या स्वरूपाचा पाऊसही पडला. या पावसाचे पाणी गव्हाच्या कुडीमध्ये गेल्यास उत्पादित होणारा गहू पांढर्‍या रंगाचा होऊ शकतो. पांढर्‍या गव्हाला बाजारात कवडीमोल दर मिळतो, त्यामुळे या भागातील गहू उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

पावसाचा इशारा…
शहरात चोवीस तासांत केवळ 1 मिमी पावसाची नोंद झाली असली, तरीही तापमानात 5 ते 6 अंशांनी घट झाली आहे. दरम्यान, 8 व 9 रोजीही शहरात वारा अन् विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गार वार्‍यांनी तापमानात 5 ते 6 अंशांनी घट
दोन दिवसांच्या पावसाने वातावरण बदलले
चोवीस तासांत 1 मिमी पावसाची नोंद
नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले

शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सोमवारी (दि. 6) रात्री आणि मंगळवारी (दि. 7) सकाळी तसेच दुपारी जिल्ह्याच्या बहुतांश भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने सर्वच पिकांना फटका बसला आहे. काही भागांत तर अवकाळीसह गारपीटदेखील झाली. प्रामुख्याने द्राक्षबागांसह काढणीस आलेला गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी, बाजरी, तसेच तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी जिल्हाभरातून होत आहे.

Back to top button