शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेन्ट, खडकवासल्याला लागणार सुरुंग ! ‘मविआ पॅटर्न’ भाजपसाठी धोक्याची घंटा | पुढारी

शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेन्ट, खडकवासल्याला लागणार सुरुंग ! ‘मविआ पॅटर्न’ भाजपसाठी धोक्याची घंटा

 पांडुरंग सांडभोर

पुणे : भाजपचा कसब्याचा बालेकिल्ला जिंकल्यानंतर आता शिवाजीनगर, खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेन्ट या तीन विधानसभा जागांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. या तिन्ही जागा अडीच ते पाच हजारांच्या मताधिक्यांनी भाजपने जिंकल्या होत्या. आता आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी पुन्हा एकत्र राहिल्यास या जागांना सुरुंग लागू शकतो.

राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडी होती. तर, भाजप-शिवसेना यांची युती होती. त्यात पुण्यातील विधानसभेच्या आठ जागा आघाडीने एकत्र येऊन लढविल्या होत्या. त्यात वडगाव शेरी, खडकवासला, हडपसर, पर्वती या चार जागा राष्ट्रवादीने, तर शिवाजीनगर, कसबा पेठ आणि पर्वती या जागा काँग्रेसने लढविल्या होत्या.

कोथरूडच्या जागेवर आघाडीने मनसेला पाठिंबा दिला होता. तर, युतीत भाजपने सर्वच्या सर्व आठ जागा एकट्याने लढविल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने कोथरूड, पुणे कॅन्टोन्मेन्ट, शिवाजीनगर, खडकवासला, पर्वती आणि कसबा पेठ या सहा जागा, तर राष्ट्रवादीने हडपसर आणि वडगाव शेरी या दोन जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला मात्र एकाही जागेवर विजय मिळविता आला नव्हता.

आता मात्र महाविकास आघाडीने एकत्र येऊन कसबा पेठ विधानसभेची भाजपकडे 28 वर्षे असलेली जागा खेचून आणली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीचा हाच पॅटर्न कायम राहिल्यास भाजपपुढे कडवे आव्हान उभे राहणार आहे. प्रामुख्याने शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेन्टच्या जागेवर काँग्रेसचा जेमतेम पाच हजार मतांनी पराभव झाला होता. तर, राष्ट्रवादीची खडकवासल्याची जागा अवघ्या अडीच हजार मतांनी गेली होती. आता आगामी निवडणुकीत आघाडीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ लाभल्यास या तीन जागांवरील राजकीय गणिते बदलू शकणार आहेत. या तिन्ही मतदारसंघांत ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांची बेरीज एकत्र येऊन कसबा पेठ प्रमाणे भाजपचा पराभव करणे शक्य होणार आहे.

राजकीय फोडाफोडीने झाला होता पराभव
शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेन्ट या दोन्ही मतदारसंघांत 2019 च्या निवडणुकीत भाजपने जोरदार राजकीय फोडाफोडी केली होती. प्रामुख्याने शिवाजीनगरमध्ये दत्तात्रय गायकवाड, मुकारी अलगुडे, सनी निम्हण, आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे यांच्यासह खडकी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे चार नगरसेवक यांच्यासह अनेक पदाधिकारी ऐन निवडणुकीत भाजपने फोडले होते. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला होता. तर, पुणे कॅन्टोन्मेन्टमध्येही हाच फॉर्म्युला राबविला गेला होता.

सदानंद शेट्टी, रशीद शेख, सुधीर जानज्योत, कॅन्टोन्मेन्टचे काही पदाधिकारी यांना पक्षात घेऊन भाजपने विजय मिळविला होता. यामधील शेट्टींची राष्ट्रवादीत, तर शेख यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. खडकवासल्यात तर राष्ट्रवादीच्या अंतर्गत बंडाळीने थोडक्यात जागा गमावावी लागली होती. याशिवाय, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेन्टमध्ये वंचित बहुजन आघाडीला दहा हजारांपेक्षा जास्त, तर खडकवासल्यात 6 हजार मते मिळाली होती. त्याचाही फटका आघाडीला बसला होता.

Back to top button