ढेकन चिरडायला तोफेची गरज नाही : खेडमधील सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात | पुढारी

ढेकन चिरडायला तोफेची गरज नाही : खेडमधील सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात

खेड; पुढारी वृत्तसेवा : जे चोरटे आहेत ते शिवसेना नाव चोरू शकतात शिवसैनिक नाही. शिवसेना तोडण्याचे प्रयत्न करणारे लोक निष्ठुर आणि निर्घृण आहेत. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही. ढेकन चिरडायला तोफेची गरज नाही, अशा शब्‍दात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्‍लाबोल केला. आज ( दि. ५ ) खेड येथील शिव गर्जना सभेत ते बोलत होते. शहरातील महाडनाका येथील एसटीच्या मैदानात हजारोंच्या उपस्थिती सभा पार पडली.

ते शिवसेना नाव चोरू शकतात शिवसैनिक नाही

या वेळी उद्धव ठाकरे म्‍हणाले की, ” डोळ्यात मावत नाही असे हे समोर आई जगदंबेची रूप आहे. मला ते दिवस आठवत आहेत मी शिवतीर्थावर माझ्या आई सोबत तुमच्यासारखे मातीमध्ये बसलो होतो. तुम्ही सगळे देव माणसे आहेत. ज्यांना आपण भरपूर दिले ते खोक्यात बंद झाले. माझ्या हातात आता काही नाही. तुमची साथ मला आहे. जे चोरटे आहेत ते शिवसेना नाव चोरू शकतात शिवसैनिक नाही.”

मला निवडणूक आयोगाला सांगायचे आहे की, डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर बघायला या. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी नाही माझ्या वडिलांनी केली आहे. शिवसेना तोडण्याचे प्रयत्न करणारे लोक निष्ठुर आणि निर्घृण आहेत. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही, असेही त्‍यांनी सांगितले.

ज्यांनी बाळासाहेबांना पाहिले नाही ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगणार

मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळला तुम्ही तुम्ही फिरून देखील सांभाळू शकत नाही. जागतिक पातळीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक झाले. कोव्हिड काळात मृतदेहांची विटंबना उत्तर प्रदेशमध्ये झाली महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात काही द्यायचे नाही आणि तुटलेल्या एसटीच्या काचावर गतिमान महाराष्ट्र लावायला लाज वाटत नाही. महाराष्ट्र माझे कुटुंब आहेच पण ज्या गतीने तुम्ही कुटुंब बदलत आहात ते परवडणारे नाही. रेवस ते रेड्डी हा रस्ता चार पदरी आणि सिमेंट चा करण्याचा प्रयत्न केला, तोक्ते आणि निसर्ग वादळाच्या वेळी देखील मी येऊन गेलो होतो. वीज वाहिन्या भूमिगत करण्यास सूरवात केली. माशी एकच ठिकाणी शिंकली. एक तोत्रा येतोय हातोडा घेऊन त्याला झेपत सुध्दा नाही. मी मुख्यमंत्री यांना नाही तर राजन साळवी, वैभव नाईक, अनिल परब हे देशद्रोही आहेत का? आज ज्यांच्या घरादारावर हे उठलेत दिवस फिरले की यांचे काय होईल याचा विचार त्यांनी करावा, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.

चोरांना तुम्ही आशीर्वाद देणार का?

पक्ष प्रमुख मिंधे चालेल का? चोरांना तुम्ही आशीर्वाद देणार का? हातात धनुष्यबाण घेण्याचा प्रयत्न करा पण तुमच्या कपाळावर गद्दार आणि खानदान चोर असल्याचा बट्टा पुसला जाणार नाही. कोकण शिवसेनेचे जीव की प्राण आहे. ज्या मैदानात शिवसेना प्रमुख कोकणी जनते समोर नतमस्तक झाले त्याच मैदानातून तुमचा आशीर्वाद घेऊन देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात लढत आहेत. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याशी देश रक्षणाशी काही संबंध नाही ते लोक सत्तेत बसले आहेत त्यामुळे देशात स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

…तर देशात हुकूमशाही सुरू होईल

मी जेव्हा सांगायचो बाळासाहेबांचा मुलगा आहे तेव्हा हे मला सांगायचे सारखं असे का सांगताय , आज तेच लोक माझ्या वडिलांचा फोटो नाव वापरत आहेत. ज्यांनी धनुष्यबाण चोरलाय त्या चोरांना तुम्ही मत देणार का? सत्तेचे गुलाम निवडणूक आयोग सांगतोय म्हणून मी घरी जाणार नाही. धनुष्यबाण घेऊन मैदानात याच चोरांनी मी मशाल घेऊन येतो होऊन जाऊदे. जर आपण आज हे केलं नाही तर देशात हुकूमशाही सुरू होईल. काहींचा जन्म शिमग्यासाठी झालाय. पण शिमग्यानंतर धुळवड होऊद्या मग बाहेर पडुया, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

माझ्यातील शिवसैनिक जिवंत होता : संजय कदम

खेड, दापोली व मंडणगड मतदार संघातील राष्ट्रवादी चे आमदार संजय कदम यांच्यासह जिल्हापरिषद सदस्य राजेंद्र आंब्रे, नफिसा परकार यांनी समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यांना शिव बंधन बांधून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. या वेळी संजय कदम म्हणाले, मी पक्ष सोडला होता तरी माझ्यातील शिवसैनिक जिवंत होता. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरेंवर हे गद्दार बोलू लागले तेव्हा माझ्यातील शिवसैनिक पेटून उठला. खेड पंचायत समिती मध्ये शिवसेनेचा सभापती, पालिकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष असेल सगळे जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेचेच असतील, असा विश्वास संजय कदम यांनी व्यक्त केला.

४० लांडगे आणि तेरा कोल्हे यांनी कायम गाडून टाकू: अनंत गीते

खेड ही विराट सभा कुरुक्षेत्र भासत आहे. या सभेनंतर एक नवी लढाई सुरू होणार आहे. एक नवीन युद्ध सुरू होणार आहे. आज केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात चित्र आहे की देश हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करतो की काय असे वाटत असताना या सभेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या विरुद्ध रणशिंग योगेश कदम याचा असा पराभव करु की रामदास कदम आणि त्यांचे कुटुबीय परत कधी निवडणूक लढवायचे धाडस करणार नाही, असे शिवसेना नेते अनंत गीते यांनी यावेळी सांगितले.

Back to top button